![]()
निफाड तालुक्यातील देवगावचे सुपुत्र सर्वेश कुशारे यांनी जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडी प्रकारात २.२५ मीटरची झेप घेत रौप्यपदक पटकावून निफाडसह महाराष्ट्राचा गौरव वाढविला. त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य व ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या निफाड तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्वेश यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली असून, निफाडची कृषी क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातील ओळखही अधोरेखित झाली आहे. गटविकास अधिकारी नम्रता जगताप व पालखेड मंडल अधिकारी वाय. व्ही. बच्छाव यांनी दूरध्वनीवरून सर्वेश यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. देवेंद्र काजळे म्हणाले, कष्ट, जिद्द, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सर्वेश यांनी मिळविलेले यश निफाडच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून, ग्रामीण भागातील गुणवत्तेला आशियाई व्यासपीठ मिळवून देणारे आहे. नम्रता जगताप म्हणाल्या, निफाडची ओळख द्राक्ष, कांदा व कृषीसमृद्ध तालुका म्हणून आहे. सर्वेश कुशारे यांच्या यशामुळे या ओळखीत क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्वाची भर पडली आहे. यावेळी देवेंद्र काजळे, स्वप्निल कुंदे, अतुल आढाव, विशाल सोनवणे, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.
Source link
खेळाडू सर्वेश कुशारेंचा निफाड ग्रामपंचायत युनियनतर्फे गौरव:उंच उडीमध्ये 2.25 मीटरची झेप घेत रौप्यपदक