Headlines

निर्णय होत नसल्याने निषेध:विहिरीत उतरून शेतकऱ्यांचे आंदोलन; खांडवी फाटा येथे ठिय्या




दुष्काळ जाहीर होऊनही आर्थिक मदतीबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवार ६ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील खांडवी फाटा येथील विहिरीत उतरून तब्बल तीन तास आंदोलन केले. युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यासह विविध मागण्या शासनासमोर मांडण्यात आल्या. यंदाच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी अद्याप नुकसानभरपाई जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे तातडीने हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. यासोबतच २०२४ मधील पीक विम्याची रक्कम अद्याप न मिळालेल्या शेतकऱ्यांना ती तत्काळ अदा करावी. तसेच २०२५-२६ या वर्षाचा प्रलंबित पीक विमाही कोणतेही नवीन निकष न लावता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, ३१ जुलै रोजी जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केले असले तरी अद्याप भरीव आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यामुळे अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, पीक कर्जासाठी बँकांकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना विविध निकष आणि काही अधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभारामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. विनाकारण शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी आंदोलनात शिवदास खिरोडकार, वैभव जाणे, आकाश आटोळे, अक्षय पाटील यांच्यासह अनिल सिंह राजपूत, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष अजय गिरी, त्रिलोक सिंग राजपूत, संतोष गंणगे, पप्पू पोटे, कय्यूम खान, अमोल पांडे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. प्रशासनाने घेतली दखल या आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. नायब तहसीलदार किटे आणि पोलिस प्रशासनाने आंदोलनस्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. तहसील कार्यालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सायंकाळी चार वाजता बैठक घेऊन मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर तीन तासांपासून विहिरीत उतरलेले शेतकरी बाहेर आले. यावेळी घोषणाबाजीने खांडवी फाट्याचा परिसर दणाणून गेला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *