![]()
पुणे महापालिकेतर्फे महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर महिला आरोग्य अभियान’ सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरात राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. पहिल्याच शिबिरात १,७५६ महिलांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. या अभियानाचा मुख्य उद्देश महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पोहोचवणे आणि आरोग्याबाबत जनजागृती करणे हा आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतमाता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, “महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हे अभियान लोकाभिमुख आणि समाजोपयोगी आहे. महिलांचे आरोग्य जपणे ही काळाची गरज असून, असे अभियान शहरातील प्रत्येक भागात राबविणे आवश्यक आहे. महिलांपर्यंत वेळेवर आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल.” महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकाराने आयोजित या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या अभियानाद्वारे महिलांना प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, नियमित आरोग्य तपासणी, आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक जनजागृती उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. हे अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसून, वर्षभर शहरातील विविध प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. पुढील शिबिरांचे वेळापत्रक आणि स्थळांची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Source link
महापौर महिला आरोग्य अभियान सुरू:पहिल्याच शिबिरात 1,756 महिलांची आरोग्य तपासणी