![]()
लखमापूर गावासाठी जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेली नळ पाणीपुरवठा योजना चार वर्षांपासून रखडली असताना विहिरीची जागाच निश्चित नसल्याने योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विहीर व पंपहाऊससाठी जागा निश्चित होण्यापूर्वीच जलकुंभ व एका वस्तीतील पाइपलाइनचे काम करण्यात आले असून, ५० टक्के बिल अदा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यातच विहीर व पंपहाऊससाठी जमीन दानपत्राद्वारे घेण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झाल्याचे पत्रव्यवहारात नमूद असले, तरी २ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या ग्रामसभेच्या मूळ इतिवृत्तात असा ठरावच नसल्याचा दावा करण्यात आल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. विहीर व पंपहाऊससाठी जमीन दानपत्राद्वारे घेण्याचा प्रस्ताव ग्रामसभेत मंजूर झाल्याचे ग्रामपंचायतीच्या पत्रव्यवहारात नमूद असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. मात्र, २ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या ग्रामसभेच्या मूळ इतिवृत्तात जमीन दानपत्र किंवा विहीर- पंपहाऊसबाबतचा ठराव नसल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते दर्शन वाघ यांनी केला आहे. ^लखमापूर येथील जलजीवन मिशनच्या कामात जलकुंभाचे ८० %काम झाले आहे. जलवाहिनीचे कामही ५० टक्के झाले आहे. विहिरीचे खोदकाम झाले असून जागेवरून वाद निर्माण झाला आहे. या कामाचे ५० टक्के बिल अदा झाले आहे. – राकेश आहिरे, शाखा अभियंता, पाणीपुरवठा योजना ^मी ग्रामसभेच्या दिवशी रजेवर होतो. मात्र, गावाचा पाण्याचा प्रश्न असल्याने काही ग्रामपंचायत सदस्यांनी ठराव देण्याबाबत सांगितले. त्यामुळे मी ठराव दिला आहे. हा स्थानिक राजकारणाचा भाग आहे. – खंडेराव पवार, ग्रामविकास अधिकारी, लखमापूर ठरावाची पडताळणी : २ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या ग्रामसभेचे मूळ इतिवृत्त तपासण्याची मागणी. रेकॉर्डिंग तपासणार : उपस्थितीपत्रक व उपलब्ध व्हिडिओ रेकॉर्डिंगचीही पडताळणी करण्याची मागणी. जबाबदारी निश्चिती : ठराव झाला नसल्यास त्यानंतरच्या प्रशासकीय पत्रव्यवहाराची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी. योजना पूर्ण करण्याची मागणी : विहिरीच्या जागेचा वाद सोडवून रखडलेली पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्याची ग्रामस्थांची अपेक्षा.
Source link
जलजीवनच्या विहिरीची जागा ठरेना; टाकीचे काम उरकले:लखमापूरला ४ वर्षांपासून रखडली योजना; काम अपूर्ण मात्र 50% निधी अदा