![]()
मोबाईल, व्हिडिओ गेम्स आणि डिजिटल दुनियेत रमलेल्या नव्या पिढीला इतिहास केवळ पुस्तकातून न शिकवता प्रत्यक्ष अनुभवता यावा, या उद्देशाने अळकुटी येथील साईनाथ हायस्कूलच्या एस.एस.सी. १९९८ माजी विद्यार्थी बॅचने आगळा उपक्रम राबविला. माजी विद्यार्थ्यांनी कुटुंबीयांसह थेट ‘शिवतीर्थ रायगड’ गाठत मुलांना स्वराज्याच्या इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती दिली. या भटकंतीत तब्बल ४० जण सहभागी झाले. ‘किल्ले मोबाईलच्या स्क्रीनवर पाहण्यापेक्षा त्याच्या मातीत पाय ठेवून इतिहास अनुभवला पाहिजे,’ या भावनेतून आयोजित केलेली ही केवळ गडभ्रमंती नव्हती, तर बालमनावर शिवसंस्कार रुजविण्याचा प्रयत्न होता. पाचाड येथून रायगडाची चढाई सुरू करताना बालगायिका सुखदा थोरात हिने ‘नमो शिवाजी राजा’ गीतातून मानवंदना दिली. हिरकणी कडा, महादरवाजा, राजसभा, सिंहासन, बाजारपेठ, टकमक टोक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेताना सहभागी भारावून गेले. काही महिलांच्या डोळ्यांत भावुकतेने अश्रूही तरळले. गाईड मनीष गोरे यांनी मुलांना गडकिल्ल्यांचे महत्त्व, मराठ्यांचे शौर्य आणि स्वराज्याचा इतिहास सोप्या भाषेत समजावून सांगितला. रायरेश्वर मंदिरात सुखदाने ‘ॐ नमः शिवाय’चे भावपूर्ण गायन करून वातावरण भक्तिमय केले. मेजर शिवाजी आवारी, मेजर दिलीप डेरे, वरिष्ठ अभियंता शिल्पा झावरे आणि फोटोग्राफर उमेश पुंडे यांनी अवघ्या ५० मिनिटांत गडचढाई पूर्ण करून मानवंदना दिली. दरम्यान, फास्ट फूडची सवय असलेल्या मुलांनी रायगडावर झुणका-भाकरचा मनसोक्त आस्वाद घेतला. नगर, पुणे, मुंबई, ओझर, पनवेल व नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा हा उपक्रम ‘शिवसंस्कारांचा वारसा’ देणारा ठरला.
Source link
मोबाईलच्या स्क्रीनऐवजी रायगडाच्या मातीत शिवसंस्कार!:अळकुटीच्या 1998 बॅचचा उपक्रम; 40 जणांची कुटुंबासह रायगडवारी, मुलांनी घेतला स्वराज्याचा प्रत्यक्ष अनुभव