![]()
जिल्ह्यात वृक्षलागवडीचा आकडा लाखोंमध्ये पोहोचला असला, तरी आता या झाडांच्या जगण्याचीच कसोटी लागली आहे. जिल्हा परिषदेच्या वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत यंदा ६ लाख ४१ हजार खड्डे खोदण्यात आले असून, त्यापैकी ४ लाख ८७ हजार खड्ड्यांत वृक्षलागवड झाली. तब्बल १ लाख ५५ हजार खड्डे अद्याप झाडांच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे पावसाने मोठा खंड दिल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे, तर दुसरीकडे लागवड केलेली झाडे जगविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला १६ हजार ४२८ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार किमान २ लाख २९ हजार वृक्षांची लागवड अपेक्षित होती. प्रत्यक्षात उद्दिष्टाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्याचा जिल्हा परिषदेचा दावा आहे. यंदा ४.८७ लाख वृक्षलागवड झाली असून, मागील वर्षासह दोन वर्षांत लागवडीचा आकडा तब्बल १२.८ लाखांवर पोहोचला आहे. एलनिनोच्या प्रभावामुळे पावसाची अनियमितता राहिली असून, पावसाळा संपत आल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे सध्या वृक्षलागवड करण्यापेक्षा लावलेली झाडे जगविण्याला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याचा मोठा भाग पश्चिम घाटाच्या पर्जन्यछायेत येत असल्याने पाण्याची उपलब्धता हा कायमच मोठा प्रश्न आहे. त्यात मियावाकी पद्धतीच्या लागवडीला सुरुवातीच्या काही वर्षांत नियमित पाणी आवश्यक असते. जिल्ह्यात मियावाकी लागवडीचा वाटा तब्बल २.९२ लाख झाडांचा आहे. याशिवाय फळबाग व परसबागेतील सुमारे २.७ लाखांहून अधिक झाडे शेतकरी व कुटुंबांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शेती सिंचनासाठीच पाण्याची टंचाई असताना या झाडांना पाणी देण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागू शकतो. पाऊस नसल्याने पुढील लागवड तूर्त थांबवली ^ यंदा आम्ही मोठ्या प्रमाणावर झाडे लावली आहेत. मात्र, पावसाने मोठा खंड दिल्याने सध्या लावलेली झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील लागवड तूर्त थांबवली आहे. पाऊस नाही म्हणून झाडे लावणे थांबवू नये, उलट झाडे लावा, असे आवाहन जनतेला केले जाणार आहे. विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून टँकरची व्यवस्था केली जाईल.” -आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
Source link
टंचाईच्या सावटाखाली 1.55 लाख खड्डे झाडांच्या प्रतीक्षेत:दोन वर्षांत झेडपीने लावली 12.8 लाख झाडे