![]()
डॉक्टरांवरील वाढते हल्ले, रुग्णांकडून होणाऱ्या खोट्या तक्रारी आणि पोलिसांकडून मिळणाऱ्या त्रासाच्या निषेधार्थ ‘डॉक्टर प्रोटेक्शन फोर्स’ने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडल्या. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर सतत हल्ले होत आहेत. तसेच समाजकंटकांकडून केल्या जाणाऱ्या खोट्या तक्रारींमुळे पोलिसांकडूनही डॉक्टरांना त्रास दिला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. डॉक्टरांना न्याय मिळावा, खोट्या तक्रारींना आळा बसावा आणि वैद्यकीय व्यवसायाला संरक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. डॉक्टर प्रोटेक्शन फोर्सचे मुख्य समन्वयक उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. यावेळी डॉ. शिवराज पाटील, डॉ. मंदार सावजी, डॉ. संतोष तळेकर, डॉ. अतुल सोनावणे, डॉ. समीर बदामी, डॉ. सिद्धार्थ शिंदे, रुग्ण हक्क परिषदेच्या अपर्णा मारणे साठे यांच्यासह शेकडो आंदोलक सहभागी झाले होते. संघटनेने डॉक्टरांवरील हल्ले आणि अत्याचाराविरोधात तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, डॉक्टरांविरोधात तक्रार असल्यास पोलिसांनी चौकशीपूर्वी त्यांना आरोपी किंवा गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली. डॉक्टरांचा सन्मान राखला जावा यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्याची मागणीही आंदोलकांनी केली. याशिवाय, डॉक्टर, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यात नियमित समन्वय बैठक आयोजित करावी, तसेच जिल्हास्तरावर डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी समन्वय समिती स्थापन करावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. उमेश चव्हाण म्हणाले, “डॉक्टर सुरक्षित असतील, तरच समाजाला चांगल्या आरोग्य सुविधा मिळू शकतात. त्यामुळे आम्ही केलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. डॉक्टरांनी जर काम करणे बंद केले, तर समाजाचे जगणे अवघड होईल. त्यामुळे त्यांचा माणूस म्हणून विचार व्हायला हवा.” डॉ. अवसाफ यांनी डॉक्टरांची बाजू मांडताना सांगितले की, रुग्ण डॉक्टरांना देवाचा दर्जा देतात, पण तेही माणूस असतात हे लक्षात घेत नाहीत. कोणताही डॉक्टर रुग्णाचा जीव वाचवण्याचाच प्रयत्न करत असतो. परंतु, आरोग्याच्या तक्रारी हाताबाहेर जातात, तेव्हा डॉक्टरांकडेही काही पर्याय उरत नाही, हे रुग्णांनी समजून घ्यायला हवे.
Source link
डॉक्टरांवरील हल्ले, खोट्या तक्रारींविरोधात पुणे येथे आंदोलन:डॉक्टर प्रोटेक्शन फोर्सने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन