Headlines

चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून डॉ. कुमार सप्तर्षी यांना श्रद्धांजली:'अभ्यासू, संवेदनशील आणि निडर आवाज हरपला' – पाटील




राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज ज्येष्ठ समाजवादी नेते, गांधीवादी विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निवासस्थानी भेट दिली. पाटील यांनी डॉ. सप्तर्षी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच, त्यांनी सप्तर्षी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. डॉ. सप्तर्षी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनामुळे समाजमनाला दिशा देणारा एक अभ्यासू, संवेदनशील आणि निडर आवाज हरपला आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, डॉ. सप्तर्षी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजवादी विचारांची प्रामाणिकपणे जोपासना करण्यात घालवले. त्यांच्या कार्याचा ठसा अनेक पिढ्यांवर कायम राहील. पाटील यांनी सप्तर्षी कुटुंबीय आणि त्यांच्या असंख्य अनुयायांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हटले. त्यांनी दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. कुमार सप्तर्षी श्रद्धांजली सभेचे दि. २६ जुलै रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, युवक क्रांती दलाचे संस्थापक, माजी आमदार आणि सत्याग्रही मासिकाचे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार दि. २६ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे विशेष श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, शिवसेना (उबाठा) प्रवक्त्या सुषमा अंधारे, माजी आमदार हुसेन दलवाई, महाराष्ट्र टाईम्सचे समूह संपादक पराग करंदीकर, लोकमतचे संपादक संजय आवटे, डॉ. कबीर सप्तर्षी, उपमहापौर परशुराम वाडेकर, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, ग्राहक पेठेचे सुर्यकांत पाठक, एम.के.सी.एल. चे मार्गदर्शक विवेक सावंत, हमाल पंचायतीचे नितीन पवार, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर आदी श्रद्धांजली सभेत सहभागी होत आहेत. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणेकरांनी या श्रद्धांजली सभेस आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव अन्वर राजन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अॅड. अंकुश काकडे यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *