Headlines

छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्ट लिपिक परीक्षेचा फज्जा:सर्व्हर डाऊन, किबोर्डही खराब; संतप्त विद्यार्थ्यांचा केंद्राबाहेरच ठिय्या




आज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हायकोर्ट लिपिक पदासाठी ऑनलाइन परीक्षा पार पडत आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. परीक्षा सुरू होताच अचानक सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला असून, यामुळे शेकडो परीक्षार्थींची परीक्षा खोळंबली. विशेषतः दूरवरून आलेल्या उमेदवारांना या अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीचा मोठा फटका बसल्याने परीक्षा केंद्रावर संतापाचे वातावरण निर्माण झाले. या तांत्रिक बिघाडामुळे संतप्त झालेल्या काही परीक्षार्थींनी गोंधळ घातल्यानंतर, वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या अधिकाऱ्यांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, खोळंबलेली परीक्षा नव्याने घेतली जाणार की विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ दिला जाणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. या अनिश्चिततेमुळे परीक्षार्थींनी थेट परीक्षा केंद्राबाहेरच ठिय्या मांडला असून, आता परीक्षा प्रशासन यावर नेमका काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. परीक्षेचे स्वरूप आणि पार्श्वभूमी या भरती प्रक्रियेसाठी 26 एप्रिल रोजी लेखी परीक्षा पार पडली होती. यातून राज्यातून एकूण 13,000 उमेदवार टंकलेखक पदासाठी पात्र ठरले होते, तर एका विशिष्ट गटासाठी सुमारे 2900 विद्यार्थी या कौशल्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. अवघ्या 5 दिवसांपूर्वी पत्र काढून ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने ‘स्क्रीन टू स्क्रीन’ होणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये 10 मिनिटांत 400 शब्द टाईप करायचे होते. एकूण 20 गुणांच्या या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 10 गुणांची आवश्यकता आहे. तसेच, या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू करण्यात आली असून 4 चुकांमागे 1 गुण वजा (1/4 निगेटिव्ह मार्किंग) केला जाणार आहे. कल्याणच्या परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांचा संताप छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ कल्याण येथील एपीएमसी मार्केटमध्ये असलेल्या परीक्षा केंद्रावरही हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेत मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. हायकोर्टातील लिपिक पदावर नियुक्तीसाठी सुरू असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या भरती परीक्षेत, वापरण्यात आलेले संगणकाचे कीबोर्ड खराब असल्याचा गंभीर आरोप उमेदवारांकडून करण्यात आला आहे. ऐन टायपिंग परीक्षेच्या वेळी कीबोर्डमध्ये बिघाड उद्भवल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या ढिसाळ कारभारामुळे संतप्त झालेल्या परीक्षार्थींनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *