Headlines

"रिक्षा चालवणार, पैसेही कमावणार, पण मराठी बोलणार नाही!":रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून मंत्री प्रताप सरनाईकांना थेट आव्हान




राज्यात 15 ऑगस्ट 2026 पासून ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलण्याची सक्ती करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ज्या उत्तर भारतीय किंवा इतर रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येत नाही, त्यांचे परमिट थेट रद्द केले जाईल. शासनाच्या या नव्या नियमाचे एका बाजूला सर्वत्र स्वागत होत असले तरी, दुसऱ्या बाजूला यावरून मोठा राजकीय वाद पेटला असून काही घटकांकडून या निर्णयाला तीव्र विरोध केला जात आहे. या सक्तीला कडाडून विरोध दर्शवत उत्तर भारतीय विकास सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पंडित संजय दुबे यांनी परिवहन मंत्र्यांना थेट आव्हान दिले आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली. या व्हिडिओच्या माध्यमातून प्रताप सरनाईक यांना खुले आव्हान देत ते अत्यंत बिनधास्तपणे म्हणाले आहेत की, “मी रिक्षा चालवणार, पैसेही कमावणार, पण मराठी कदापि बोलणार नाही.” त्यांच्या या स्पष्ट आणि थेट आव्हानामुळे आता महाराष्ट्रात रिक्षाचालकांच्या परमिट आणि मराठी भाषेच्या सक्तीवरून सुरू असलेला हा वाद आणखीनच चिघळला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत संजय दुबे म्हणाले, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. मात्र आजच्या दिवशी राज्याचे परिवहन मंत्री आमच्यावर पुन्हा हा नियम लागून करुन गुलामी पत्करायला सांगत आहे. कोणताही तरुण ही गुलामगिरी आता सहन करणार नाही. तुम्ही मराठी भाषेच्या नावाखाली आम्हाला धमकवतात आहात? हा हिंदुस्तान आहे आणि आम्ही प्रेमाच्या भाषेचा नक्कीच आदर करू, पण सत्तेच्या जोरावर कोणतीही गोष्ट लादता येणार नाही. माझेही काही मराठी भाषा बोलणारे मित्र आहेत, मी त्यांचा नेहमीच आदर केला आहे, पण जर तुम्ही गुंडगिरी करणार असाल तर मात्र आम्ही खपवून घेणार नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या डेडलाईनला थेट आव्हान देताना पंडित संजय दुबे यांनी अत्यंत उर्मट भाषेत टीका केली आहे. तुमचे हे सरकार फार काळ टिकणार नसून ते लवकरच कोसळणार आहे, असा इशारा देत ते म्हणाले की, उत्तर भारतीय विकास सेनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी बजावून सांगतो की, जर तुम्ही आम्हाला गुलामी करायला सांगत असाल, तर आम्ही तुमचे कदापि ऐकणार नाही. तसेच, तुमची भाईगिरी आणि गुंडगिरी इथे अजिबात चालणार नाही. मी रिक्षा चालवणार, पैसेही कमावणार, पण मराठी मात्र बोलणार नाहीच, अशा अत्यंत स्पष्ट आणि आक्रमक शब्दांत दुबे यांनी सरनाईक यांना खुले आव्हान दिले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *