Headlines

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले




जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक निष्ठेचे अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. नातेवाईकांच्या अनुपस्थितीत परतानी यांनी ही जबाबदारी स्वीकारली. संबंधित ८७ वर्षीय महिला भक्त अनेक वर्षांपासून श्री महारुद्र मारुती संस्थानच्या नित्य भक्त होत्या. त्या नियमितपणे अमरावतीहून जहागीरपूर येथे दर्शनासाठी येत असत. त्यांच्या निधनानंतर नातेवाईकांच्या अनुपस्थितीमुळे किंवा इतर अडचणींमुळे त्यांच्या अंत्यविधीचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब समजताच ओमप्रकाश परतानी यांनी तत्परता दाखवली. त्यांनी केवळ एक विश्वस्त किंवा कार्यकारी संचालक म्हणून नव्हे, तर एक पुत्र म्हणून या भक्ताच्या अंतिम संस्काराची जबाबदारी स्वीकारली. परतानी यांनी स्वतःच्या हाताने मुखाग्नी देऊन या वृद्ध मातेच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार केले. त्यानंतर श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे सन्मानपूर्वक अस्थी विसर्जनही करण्यात आले. एवढेच नव्हे, तर पुढील दहा दिवसांपर्यंत त्या आजीच्या स्मृतीप्रित्यर्थ मंदिरात आवश्यक धार्मिक अनुष्ठानही केले जात आहे. “मंदिर आणि भक्त यांचे नाते हे ईश्वरी असते. अशा कठीण प्रसंगी भक्तांच्या पाठीशी उभे राहणे हेच खरे धर्मकार्य आहे,” अशी भावना परतानी यांनी व्यक्त केली. त्यांच्या या कृतीमुळे केवळ मंदिर समितीच नव्हे, तर परिसरातील भाविकही भारावून गेले आहेत. श्री महारुद्र मारुती संस्थानच्या अन्य विश्वस्तांनी आणि पदाधिकाऱ्यांनी परतानी यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आजच्या काळात मानवी नातेसंबंधांत दुरावा येत असताना, ही सेवा समाजासाठी एक मोठा आदर्श ठरली आहे. धार्मिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी कशी जपावी, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. या घटनेमुळे जहागीरपूर परिसरातील भाविकांमध्ये श्री महारुद्र मारुती संस्थानच्या प्रती असलेली श्रद्धा अधिक दृढ झाली असून, परतानी यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *