Headlines

जिल्ह्यातील भोंदू डॉक्टर शोधून कारवाई करा:आमदार संग्राम जगताप




प्रतिनिधी | अहिल्यानगर अहिल्यानगर शहर व जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी किंवा ज्ञान नसताना सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळेच या भोंदू डॉक्टरांचे फावले असून, शासनाने या संपूर्ण प्रकरणाची कडक कलमांखाली चौकशी करावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. जगताप म्हणाले, “नुकतीच राहुरी येथे तन्वीर हारुण देशमुख आणि श्रीरामपूर भागात डॉ. राज शेख या बोगस डॉक्टरांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यात असे शेकडो भोंदू डॉक्टर ग्रामीण व शहरी भागात सर्रास प्रॅक्टिस करत आहेत. हे भोंदू डॉक्टर सोशल मीडियाचा वापर करून, बोगस औषधोपचारांचे रील बनवून सर्वसामान्य नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत. नागरिक अशा खोट्या जाहिरातींना बळी पडत असून त्यांची आर्थिक व शारीरिक फसवणूक होत आहे.” जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) आणि संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी आजवर केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे अधिकारी आणि बोगस डॉक्टर यांच्यातील लागेबंधांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमदार जगताप यांनी यावेळी केली. अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत भोंदू डॉक्टर रुग्णांवर अनधिकृत औषधांचा वापर करून एक प्रकारे “ह्युमन ट्रायल’ (मानवी चाचण्या) घेत होते का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. पोलीस आणि आरोग्य विभागाने संयुक्त मोहीम राबवून अशा डॉक्टरांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. वैद्यकीय संघटनांनीही अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *