![]()
नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटर्मिन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून टर्मिन इंजेक्शनच्या १०० बाटल्या आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सूरज पद्माकर भुत्ते (वय १९) आणि आकाश गणेश धनवटे (वय १९, दोघे रा. लोणीकंद) अशी आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वाघोली पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने २२ जुलै रोजी पहाटे सुमारे ६.१५ वाजता आय.व्ही. इस्टेट रोडवरील ऑर्चिड साई प्रॉपर्टीज परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान, आरोपींकडून ३० मिली क्षमतेच्या मेफेनटर्मिन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनच्या १०० बाटल्या आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे दोन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी ही इंजेक्शने ऑनलाइन मागविल्याची माहिती समोर आली आहे. या इंजेक्शनचा पुरवठा करणारे कोण आहेत, त्यामागे आणखी कोणाचे रॅकेट कार्यरत आहे आणि ही इंजेक्शने कोणाला विकली जात होती, याचा वाघोली पोलिस अधिक तपास करत आहेत.
Source link
टर्मिन इंजेक्शनची अवैध विक्री:दोघे अटकेत; 100 बाटल्या जप्त, वाघोली पोलिसांची 'मिशन क्रॅकडाऊन' अंतर्गत कारवाई