Headlines

ठाकरे गटच्या खासदाराच्या वक्तव्याने पुन्हा राजकीय खळबळ:उद्याचं सांगता येत नाही, सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण; शिंदे गटात जाणार?




महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असताना, परभणीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या वक्तव्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी, मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचं काही सांगता येणार नाही, असे विधान केले. या एका वाक्यामुळे त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. परभणीतील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी आपल्या पक्षनिष्ठेबद्दल बोलताना स्पष्ट केले की, ज्या पक्षाने मला घडवले, त्याच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे आणि पुढेही राहील. त्यांनी आपल्याला संधी देणाऱ्यांशी प्रतारणा करण्याची मानसिकता नसल्याचे सांगितले. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत भविष्यात काय होईल, याबद्दल ते ठामपणे काही सांगू शकत नसल्याचे त्यांनी नमूद केले. याच भाषणात त्यांनी सध्याच्या राजकारणातील बदलत्या मूल्यांवरही भाष्य केले. त्यांच्या मते, राजकारण आता समाजकारणापेक्षा आर्थिक निकषांवर अधिक चालू लागले आहे. मतदारांच्या अपेक्षांमध्येही बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. आज मतदारांना कामांपेक्षा पैशांमध्ये अधिक रस दिसतो. मतदानाच्या वेळी काही लोक उघडपणे पैशांची अपेक्षा करतात, असा अनुभव त्यांनी मांडला. आपल्या विचारांना अधोरेखित करताना त्यांनी एक म्हणही सांगितली की, मन चंगा तो कटोरी में गंगा, नियत में खतरा तो झोली में पथरा. या म्हणीद्वारे त्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो, असा अप्रत्यक्ष संकेत दिला. आम्ही राजकारणात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. योग्य वेळ आल्यावरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जाधव कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष संजय जाधव हे परभणी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या बोलण्यातून अस्वस्थता जाणवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेषतः त्यांनी भविष्यातील भूमिकेबाबत स्पष्टता न दिल्याने तर्कवितर्कांना अधिक वाव मिळाला आहे. दरम्यान, जर संजय जाधव यांनी शिंदे गटाची वाट धरली, तर मराठवाड्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो, असे मानले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जाधव कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *