![]()
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय शीतयुद्ध आता पूर्णपणे चव्हाट्यावर आले आहे. अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आयोजित बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत बोचऱ्या आणि परखड शब्दांत टीका करत रोहित पवारांचे जुने दाखले काढून त्यांना चांगलेच फटकारले. अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीनंतर त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी बैठक पार पडली. या विजयानंतर महाविकास आघाडीकडून होत असलेल्या ‘घोडेबाजार’च्या आरोपांचा सुनील तटकरेंनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “या पराभवामुळे विरोधकांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला आहे, म्हणूनच ते आता घोडेबाजार झाल्याची रडगाणी गात आहेत. लोकशाहीत निकाल लागल्यानंतर निदान समोरच्याचे अभिनंदन करायची संस्कृती तरी विरोधकांनी शिकावी.” पुढे बोलताना सुनिल तटकरे यांनी रोहित पवारांना ताकीद दिली की, “रोहित पवारांनी माझ्या घराण्यावर बोलू नये. पवार घराणे हे देशात आणि महाराष्ट्रात मोठे योगदान देणारे घराणे आहे, पण त्यांची पुढची पिढी ज्या पद्धतीने बोलतेय, हा त्यांचा वैयक्तिक स्तर आहे. मला रायगडच्या जनतेने निवडून दिले आहे, हे त्यांनी विसरू नये.” भाजप उमेदवारीसाठी कोण वर्षाचे उंबरठे झिजवत होते? “राष्ट्रवादी पक्ष भाजपला सोडणार असेल तर आम्ही एकत्र येऊ,” या रोहित पवारांच्या विधानाचा समाचार घेताना सुनिल तटकरेंनी त्यांच्यावर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला आणि काही अंतर्गत गंभीर खुलासे केले. तटकरे म्हणाले, “रोहित पवारांना सल्ला देण्याचा अधिकार कोणी दिला? तुमचे स्वतःचे सहकारी आधी टिकवा. एकेकाळी हडपसरमधून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी तुम्ही कोणाला सोबत घेऊन ‘वर्षा’ बंगल्याचे उंबरठे झिजवत होता, याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे.” “राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, कर्जत-जामखेडमधून आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही कोणाकोणाचे पाय धरले, कुणासोबत जाऊन वर्षा बंगल्याचे उंबरठे झिजवले, याचीही सर्व माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे उगीच आपल्यालाच जास्त राजकारण कळते, असा आव आणू नये.” रोहित पवारांनी दुटप्पी राजकारण करू नये अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झालेल्या पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरही सुनिल तटकरेंनी स्पष्टीकरण दिले. “आम्ही महायुतीत आहोत आणि भाजप हा आमचा प्रमुख मित्रपक्ष आहे. आम्ही भाजपला सोडण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे विलीनीकरणाच्या भूलथापा मारून रोहित पवार दुटप्पी राजकारण करत आहेत,” असे तटकरे म्हणाले. नवनीत राणांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाही अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर रोहित पवारांनी ‘छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळावी’ असा सल्ला दिला होता. त्यावर सुनिल तटकरेंनी स्पष्ट केले की, “आमच्या पक्षात कोणी बाहेरच्याने सल्ला देण्याची गरज नाही. नवनीत राणा यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर पाठवण्याचा पक्षाचा कोणताही विचार नाही. तर छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. आज संध्याकाळी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून, त्यात राज्यसभेच्या जागेसाठीचे नाव अंतिम केले जाईल.”
Source link
तटकरे विरुद्ध रोहित पवार वाद पेटला!:वर्षा बंगल्याचे उंबरठे कोणी झिजवले, सगळी माहिती माझ्याकडे; सुनील तटकरेंचा थेट इशारा