![]()
देशभरातील कथित पेपरफुटीच्या घटनांविरोधात वाढत असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी येथे सर्वपक्षीय व सर्व संघटनांच्यावतीने ऐतिहासिक एकदिवसीय बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शेतकरी, युवक, विविध सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी संकुले, किरकोळ दुकाने तसेच विविध सेवा आस्थापनांमध्ये शुकशुकाट होता. व्यापाऱ्यांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याशी एकात्मता व्यक्त केली. दुपारी बारा वाजता पेट्रोल पंप चौकात सर्वपक्षीय निषेध आंदोलनास प्रारंभ झाला. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, व्यापारी संघटना, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले होते. “पेपरफुटी बंद करा, विद्यार्थ्यांना न्याय द्या, शिक्षण वाचवा -भविष्य वाचवा, भ्रष्टाचाराचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत वक्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांवर तीव्र टीका केली. देशभरातील लाखो विद्यार्थी अनेक वर्षे कठोर परिश्रम करून विविध स्पर्धा परीक्षा देतात, पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्यभराची कमाई खर्च करतात; मात्र कथित पेपरफुटी, गैरव्यवहार आणि निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असून त्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष, किसान-मजदूर संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय बौद्ध महासभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, छत्रपती संघटना यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Source link
तिवस्यात बाजारपेठ दिवसभर बंद:केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी