![]()
जायकवाडी, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेमुळे पैठण तालुक्यात वर्षभर पाणीसाठा राहतो. बागायत शेती सुरू राहते. खतांची मागणी सातत्याने वाढते. शेतकऱ्यांना खत व बियाण्यांचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रशासनाने आतापासून काटेकोर नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार विलास भुमरे यांनी दिल्या. पंचायत समिती कार्यालयात खरीप हंगाम नियोजन बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. तसेच ३ कृषी सहायकांविरोधात निलंबनाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीला तहसीलदार ज्योती पवार, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, जिल्हा परिषद सदस्य पोपट औटे, सभापती वैशाली बोंबले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमदार भुमरे म्हणाले, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. ही जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी. कृषी अधिकारी गावपातळीवर जात नसल्याच्या तक्रारी गंभीर आहेत. संबंधितांवर कारवाईचा प्रस्ताव सादर करावा. बालानगर, आपेगाव, आडुळ येथील कृषी सहाय्यकांविरोधात निलंबनाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शेतकरी, खत विक्रेते, अधिकारी यांच्यात समन्वय राहिला तर खत टंचाई टाळता येईल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना वेळेवर माहिती द्यावी. उसाचे क्षेत्र वाढत आहे. बियाण्यांची कमतरता भासत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले. यापुढे शेतकऱ्यांच्या तक्रारी सहन केल्या जाणार नाहीत. त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आ. भुमरे यांनी दिला. बैठकीला दादा गलांडे, प्रियंका भुजंग, सखू झारगड, उमेश तट्टू, सह सपोनि, ईश्वर जगदाळे, राजेश कांबळे, भुषण कावसानकर, विनोद बोंबले, सतिष अंधाळे, शेखर शिंदे उपस्थित होते. पीकपद्धतीत बदल करा पावसाच्या आगमनानुसार पिकपद्धतीत बदल करण्याचा सल्ला देण्यात आला. उशिरा पाऊस झाल्यास पर्यायी पिकांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले. रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळावा. संतुलित शेती पद्धतीचा अवलंब करावा, यावर भर देण्यात आला. आमदार भुमरे यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यामुळे कृषी विभागाचा यापुढे दरमहा स्वतः आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Source link
तीन कृषी सहायकांविरोधात निलंबनाचा अहवाल सादर करा:आमदारांकडून निर्देश, खते, बियाण्यांचा तुटवडा भासू नये, यासाठी नियोजन करण्याचे आवाहन