![]()
गेल्या ३० वर्षांपासून अविरत सुरू असलेली अमरावती-नागपूर-गोंदि या ही पहाटेची महत्त्वाची बस सेवा मागील दोन आठवड्यांपासून अचानक बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील असंख्य प्रवाशांचे हाल होत असून, संतप्त प्रवाशांनी मोझरी बसस्थानक व्यवस्थापक तसेच विभागीय वाहतूक नियंत्रण, भंडारा यांना निवेदन सादर केले आहे. अमरावती मुख्य बसस्थानकावरून दररोज पहाटे ५:१५ वाजता सुटणारी ही बस अमरावती, गुरुकुंज मोझरी, तळेगाव, कारंजा, नागपूर आणि गोंदिया या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुख्य दुवा म्हणून ओळखली जात होती. विशेषतः नागपूर व गोंदिया येथे नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत होती. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता ही सेवा बंद करण्यात आल्याने प्रशासनाविरोधात प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. परिणामी गुरुकुंज मोझरी येथील प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. मात्र सध्या ही बस सेवा बंद असल्याने अथवा थांबा रद्द केल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे, ज्यामुळे त्यांना अधिक भाडे मोजावे लागत आहे. अमरावती-गोंदिया बससेवा पूर्ववत सुरू करावी व मोझरी येथील थांबा कायम ठेवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्यासह किशोर खवले, जयंत निखाडे, रावसाहेब वानखेडे, गजानन ठाकरे, जयंत तायवाडे, भूषण विघ्ने, विनोद मेश्राम, मनोज वैद्य, अनिल मेश्राम, मनोहर आखरे, प्रफुल बद्रे उपस्थित होते. लवकरच सेवा पुर्ववत करण्यात येईल अमरावती-नागपूर-गोंदि या या पहाटेच्या बससेवेबाबत प्रवाशांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. संबंधित डेपोशी समन्वय साधून ही सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही सुरू आहे. येत्या दोन दिवसांत बसचा थांबा व सेवा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती भंडाराचे विभागीय वाहतूक नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली.
Source link
गुरूकुंज मोझरी गावामधून जाणारी पहाटेची अमरावती-गोंदिया बस बंद:दररोजच्या प्रवाशांचे होतायेत हाल, बस पुर्ववत सुरू करण्याची मागणी