Headlines

तुटलेल्या खिडक्या, गंजलेले पत्रे, उखडलेली फरशी…:अशा अवस्थेत 'स्कूल चले हम'; दुर्घटना टाळण्यासाठी 2-3 वर्गाचे विद्यार्थी बसवतात एकाच खोलीत




शाळांची घंटा वाजली आहे पण ग्रामीण भागातील चिमुकल्यांना बसायला सुरक्षित वर्गखोल्याच नाहीत. पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन आणि भौतिक सुविधांच्या नावाखाली प्रशासनाकडून केवळ वल्गना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील २०८४ पैकी तब्बल १२१२ जिल्हा परिषद शाळा अक्षरशः मोडकळीस आल्याचे भयंकर वास्तव समोर आले आहे. गंजलेले पत्रे, फुटलेल्या फरशा, गळके छत आणि गायब असलेली स्वच्छतागृहे या दयनीय अवस्थेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी दिला जातो तरी देखील शाळांची दुरावस्था कायम आहे. शहरालगत असलेल्या पळशी येथील जि.प. शाळेत १९७० मधील ८ वर्गखोल्या असून त्यांचे पत्रे आणि अँगल पूर्णपणे तुटले आहेत. ऐन पावसाळ्यात ३१० विद्यार्थ्यांच्या अंगावर छत कोसळण्याची भीती प्रभारी मुख्याध्यापक पंकज मंडगे यांनी व्यक्त केली. धक्कादायक म्हणजे, या शाळेत पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही आणि परिसरात माकडांची प्रचंड दहशत आहे. चौक्याजवळील शाळेत स्वच्छतागृहांची अवस्था नरकासमान आहे, तर रायगवानच्या शाळेला साधी सुरक्षा भिंतच नाही. लामकाना तांड्यावरील संतापलेले नागरिक म्हणतात, अधिकारी फक्त येतात अन् पाहून जातात, इथे शाळेत जाण्यासाठी रस्ताही नाही आणि कुणी काही करतही नाही. विशेष म्हणजे शाळा अनेक शाळामध्ये वर्ग खोल्या मोडकळीस आल्याने दोन ते तीन वर्गातील विद्यार्थी एकाच वर्गात बसवत असल्याचा धक्कादायक प्रकार देखील अनेक ठिकाणी घडत आहे. ३.४६ कोटींचा प्रस्ताव कागदावरच अतिवृष्टीमुळे कन्नड (२५), गंगापूर (३६), सिल्लोड (३९), वैजापूर (१२) आणि फुलंब्री (६) अशा एकूण ११८ शाळांचे अतोनात नुकसान झाले आहे. पत्रे उडाले, भिंती पडल्या. या शाळांच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाने तब्बल ३ कोटी ४६ लाखांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, अद्याप या शाळांची अवस्था ‘जैसे थे’ असून चिमुकल्यांना याच मृत्यूच्या सापळ्यात बसावे लागत आहे. शिक्षणाधिकारी म्हणतात वरिष्ठाना प्रस्ताव पाठवला मोडकळीस आलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी केवळ ‘शाळांची तपासणी करून वरिष्ठ स्तरावर सीईओंना अहवाल दिला आहे’, असे उत्तर दिले. ‘डीपीडीसी’ आणि ‘सीएसआर’मधून निधी आणून दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले. शाळांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ तातडीने करा शिक्षक समितीच्या जिल्हाध्यक्ष विजय साळकर म्हणाले, नवीन सीईओ विद्यार्थ्यांसाठी काम करत आहेत, पण आता संपूर्ण जिल्हाभरातील शाळांचे तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची वेळ आली आहे. जि.प. शाळेतील मुले हुशार आहेत, त्यांना केवळ भौतिक सुविधांची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाशी सुरू असलेला हा खेळ त्वरित थांबवावा. शाळा दुरुस्तीची कामे सुरु आहेत पी. एम. मिन्नू, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात, शाळा दुरुस्तीची कामे सुरु आहेत. काही ठिकाणी अद्यापही कामे बाकी आहे. शिक्षण विभागाकडून अहवाल मागितला असून स्वतः यावर लक्ष ठेवून आहे. मुख्यध्यापकांना देखील काही अडचणी असल्यास त्यांनी थेट येऊन सांगितले तरी चालेल. तालुकानिहाय शाळा दुरुस्तीची गरज तालुका – एकूण शाळा – दुरुस्ती आवश्यक छत्रपती संभाजीनगर -२६३ – १४७
पैठण – २६४ – २०१
फुलंब्री – २०५ – ८८
गंगापूर – २४४ – १५०
खुलताबाद – १०९ – ५८
सिल्लोड – २८१ – १४०
सोयगाव – १०० – ४५
कन्नड – ३०७ – १९९
वैजापूर – ३११ – १८४



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *