Headlines

दररोज शाळेत जाताना मनात मृत्यूची भीती !:शाळकरी मुलांनी व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे रस्त्याची मागणी केली




पालघरमधील शाळकरी मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वैतरणा खाडीवर पूल उभारण्याची भावनिक मागणी केली आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी आणि स्थानिकांना जीव धोक्यात घालून धोकादायक मार्गाचा वापर करावा लागत असल्याने या मुलांनी थेट सरकारकडे पूल बांधण्याची विनंती केली आहे. सफाळे आणि वैतरणा रेल्वे स्थानकांच्या मधोमध असलेल्या वाढीव बेट परिसरातील सुमारे चार हजार नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गावाला मुख्य रस्त्याशी जोडणारा सुरक्षित आणि कायमस्वरूपी मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना रेल्वे पुलावरील रुळांवरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.वाढीव बेट परिसरातील विद्यार्थ्यांच्या लक्षात ही गंभीर समस्या आल्यानंतर त्यांनी पुढाकार घेत एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वैतरणा खाडीवर पूल उभारून नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची भावनिक मागणी केली आहे. नेमक प्रकरण काय आहे. परिसरात सुरक्षित रस्ता आणि पूल नसल्याने शाळकरी मुलांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळांवरून प्रवास करावा लागत असल्याची व्यथा सोहिल सुनील चौधरी या विद्यार्थ्याने मांडली आहे. “भारताचे माननीय पंतप्रधान मोदी साहेब, तुम्ही टीव्हीवर नेहमी म्हणता की मुले हेच भारताचे भविष्य आहेत. मग आमच्या वयाच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी साधा रस्ता का नाही?” असा थेट सवाल त्याने केला आहे. दररोज शाळेचे दप्तर पाठीवर घेऊन जाताना मनात मृत्यूची भीती असते, असे सोहिल सांगतो. “आम्हाला दररोज त्या जीवघेण्या रेल्वे ट्रॅकवरून आणि पुलावरून चालत जावे लागते. मागून एखादी एक्सप्रेस गाडी आली, तर आम्ही भीतीने थरथर कापतो,” असे तो म्हणतो. यानंतर सोहिलने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भावनिक आवाहन केले आहे. मोठे रस्ते आणि बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प उभारले जात असताना, आमच्या भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळेत जाण्यासाठी सुरक्षित मार्ग का नाही, असा सवाल त्याने उपस्थित केला. “फडणवीस साहेब, तुम्ही संपूर्ण देशात मोठे रस्ते आणि बुलेट ट्रेन आणली आहे, बरोबर ना? मग आमच्या नशिबात फक्त ‘मृत्यूचा मार्ग’ का? आम्हाला आमच्या हक्काचा सुरक्षित रस्ता द्या,” अशी मागणी सोहिलने केली आहे. ही समस्या केवळ शाळकरी मुलांपुरती मर्यादित नसून, स्थानिक नागरिकही सुरक्षित आणि कायमस्वरूपी मार्गाची मागणी करत आहेत. वैतरणा खाडी ओलांडण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागू नये, यासाठी या परिसरातील सुरक्षित कनेक्टिव्हिटीचा प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज या चिमुकल्याच्या भावनिक आवाहनातून पुन्हा अधोरेखित झाली आहे. अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला वाढीव परिसरातील नागरिकांना गावाबाहेर जाण्यासाठी सुरक्षित पर्यायी मार्ग नसल्याने रेल्वे मार्गाचाच आधार घ्यावा लागतो. रेल्वे पुलावरून ये-जा करताना समोरून किंवा मागून रेल्वे येत असल्यास नागरिकांना बाजूला असलेल्या चौकीत थांबावे लागते. रेल्वे गेल्यानंतर पुन्हा रुळांवरून प्रवास सुरू करावा लागतो. दररोजचा हा प्रवास नागरिकांच्या जिवाशी खेळ ठरत आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, वाढीव परिसरातील रेल्वे मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून, या अपघातांत अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रेल्वे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त पाहणी करून नागरिकांसाठी सुरक्षित पर्यायी मार्ग तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. हेही वाचा… द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या जिम्नॅस्टिक प्रशिक्षकावर पॉक्सो गुन्हा:16 वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप; व्हॉट्सॲपवर मेसेज करून बोलावले

द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या ४८ वर्षीय जिम्नॅस्टिक प्रशिक्षकाविरुद्ध १६ वर्षीय विद्यार्थिनीची छेडछाड केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील पार्ले पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून प्रशिक्षकाविरुद्ध POCSO कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे.सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *