![]()
सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? भाऊ रंगारी की टिळक? या प्रश्नावर पुण्यात अजूनही वाद सुरू आहे. अशा स्थितीत राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एक महत्त्वपूर्ण टिपण्णी केली. ‘अखंड हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव’ असा उल्लेख करून सोलापूरच्या आजोबा गणपती ट्रस्टला १० लाख रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली. यातून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय २ जुलैला प्रसिद्ध झाला. अखंड हिंदुस्थानात सोलापूरचे आजोबाच सार्वजनिक गणेशोत्सवात पहिले होते, यावर राज्य शासनाकडूनच शिक्कामोर्तब झाले. १८८५ मध्ये आजोबा गणपती ट्रस्टची स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. कै. अप्पासाहेब वारद आणि लोकमान्य टिळक यांची घनिष्ठ मैत्री होती. टिळक सोलापूरला आले की, वारद यांच्या घरीच मुक्कामाला असत. शुक्रवार पेठेतील आजोबा गणपती दर्शनासाठी दोघे एकत्र गेले होते. तिथे जमलेली गर्दी पाहून टिळकांना ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ची कल्पना सुचली आणि १८९४ मध्ये त्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. त्याच्या ८ वर्षे अगोदरच सोलापुरात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झालेली होती. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा श्रीगणेशाही सोलापुरातूनच झाला आजोबा गणपतीची पहिली मूर्ती नीलप्पा उजळंबे, आडव्यप्पा माळगे या मूर्तिकारांनी बनवली. कामठ्या, रद्दीचा कागद, खळ, चिंचुक्याचे पीठ आणि कापडापासून पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यात आली होती. सुरुवातीला शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या घरासमोर आणि त्यानंतर त्रिपुरंतकेश्वर मंदिरात बसवून तिथेच गणेशोत्सव साजरा व्हायचा. दरम्यानच्या काळात सिद्धेश्वर मंदिरात शिखराच्या कामासाठी केरळम् येथील कलाकार आले होते. त्यांनी आजोबा गणपतीची मूर्ती जीर्ण झाल्याचे सांगितले. त्यांच्याकडून विद्यमान असलेली आकर्षक मूर्ती तयार करून घेण्यात आली. जुनी मूर्ती टाकळीच्या भीमा नदीत विसर्जित करण्यात आली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी शासन, प्रशासन अद्यापही धडपडत अाहे. परंतु १४२ वर्षांपूर्वीच सोलापुरात त्याचा श्रीगणेशा झालेला होता. सांस्कृतिक महोत्सव अद्याप ठरलेले नाही सांस्कृतिक महोत्सवासाठी शासनाने १० लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. महोत्सव श्रावणात घ्यायचे की, गणेशोत्सवात हे अद्याप ठरलेले नाही. ट्रस्टींच्या बैठकीतच कार्यक्रमाचे स्वरूप, तारखा आणि वेळा निश्चित करू. अखंड हिंदुस्थानात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून सोलापूरच्या आजोबा गणपतीचा उल्लेख झाला. ही सोलापूरसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे यंदाचा सांस्कृतिक महोत्सव भव्यदिव्यच असेल. आमदार विजयकुमार देशमुख, ट्रस्टचे अध्यक्ष महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1885 : सोलापुरात आजोबा गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना.
1892 : भाऊ रंगारी यांच्याकडून पुण्यात गणेशोत्सवाला प्रारंभ.
1894 : टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. हा उत्सव महाराष्ट्राचा लोकोत्सवच झाला.
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:अखंड हिंदुस्थानातील पहिला गणेशोत्सव साेलापुरातील आजाेबाचाच; शासनाची मोहोर!