![]()
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण रखडलेल्या राज्यातील ३.१८ लाख शेतकऱ्यांसाठी सहकार आयुक्त कार्यालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांचे बोटांचे ठसे जुळत नाहीत, अशा प्रकरणांत आता आपले सरकार सेवा केंद्र चालकाचा ठसा घेऊन तालुकास्तरीय समितीमार्फत पडताळणी केली जाणार आहे. या नव्या कार्यपद्धतीमुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. राज्यात या योजनेअंतर्गत १६.६६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. नियमानुसार कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र, बँक खात्याला आधार जोडलेले नसणे, वयोमानामुळे किंवा कष्टाच्या कामांमुळे बोटांचे ठसे न जुळणे या तांत्रिक अडचणींमुळे ३.१८ लाख शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण रखडले होते. ही अडचण लक्षात घेऊन सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांनी सर्व जिल्ह्यांना नवीन प्रणाली राबवण्याचे निर्देश दिले आहेत. १३.४८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण राज्यात १६.६६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. आतापर्यंत १३.४८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण होताच कर्जमुक्तीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे, त्यांनी तातडीने जवळच्या आपले सरकार केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अशी असणार पडताळणीची नवी प्रक्रिया आपले सरकार केंद्रावर शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या बोटांचे तीन वेळा प्रमाणीकरण केले जाईल, तिन्ही प्रयत्नांत यश न आल्यास, केंद्रचालक “प्रमाणीकरण शक्य नाही’ हा पर्याय निवडून स्वतःच्या बोटाचा ठसा देईल आणि ती तक्रार प्रणालीद्वारे तालुका समितीकडे पाठवेल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याला तहसील कार्यालयात आधार कार्ड, बँक पासबुक आणि ७/१२ उतारा सादर करून ओळख पटवावी लागेल. तालुकास्तरीय समिती सर्व कागदपत्रांची छाननी करून आधार क्रमांक बरोबर असल्यास प्रमाणीकरण पूर्ण करेल.
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:कर्जमाफीसाठी ठसे न जुळणाऱ्या शेतकऱ्यांची समितीद्वारे पडताळणी, ‘आधार’चे प्रमाणीकरण होणार