![]()
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्या वतीने देवगिरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सारथीच्या ४० संशोधक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘सारथी’ संस्थेतर्फे 26 मे ते 25 जून 2026 या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 1 ते 7 जून दरम्यान गड-किल्ले परिसर स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात आला. व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील आणि उपव्यवस्थापकीय संचालक सुवर्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावर ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. या मोहिमेदरम्यान किल्ला परिसरातून सुमारे 10 गोणी कचरा संकलित करण्यात आला. यामध्ये सुमारे 12 किलो प्लास्टिक पिशव्या आणि अन्य टाकाऊ वस्तूंचा समावेश होता. दौलताबाद प्रशासनाच्या सहकार्याने संकलित कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत एकूण 40 पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राहुल निकम यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सकाळी 6 ते 10 या वेळेत स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली. ‘सारथी’च्या छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला. ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या स्वच्छता मोहिमेमुळे देवगिरी किल्ला परिसर अधिक स्वच्छ आणि पर्यटकांसाठी आकर्षक बनण्यास मदत झाली आहे.
Source link
देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम:40 संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग