Headlines

देशभरात 99 मराठी साहित्य संमेलने होणार:100 वे साहित्य संमेलन प्रत्येक मराठी भाषिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प; पुणे विद्यापीठात कार्यशाळा




शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी देशभरात ९९ एकदिवसीय साहित्य संमेलने आयोजित केली जाणार आहेत. या उपक्रमाच्या नियोजनासाठी आणि आयोजकांना मार्गदर्शन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रविवारी (२६ ऑगस्ट) विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची संयोजक संस्था असलेल्या समर्थ युवा फाउंडेशनचे विश्वस्त राजेश पांडे यांनी ही माहिती दिली. पांडे यांनी सांगितले की, शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारीदरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात होणार आहे. या ऐतिहासिक संमेलनाची व्याप्ती केवळ पुण्यापुरती मर्यादित न ठेवता, मराठी भाषा आणि साहित्याचा उत्सव देशभर पोहोचवण्याचा संकल्प आहे. याचाच एक भाग म्हणून यापूर्वी संमेलन भरलेल्या देशातील विविध ठिकाणी ९९ एकदिवसीय साहित्य संमेलने आयोजित केली जातील. यात महाराष्ट्रासह राज्याबाहेरील शहरांचा समावेश असेल. या एकदिवसीय संमेलनांचे नियोजन, कार्यक्रमांची रूपरेषा, स्थानिक साहित्यिकांचा सहभाग आणि जनसंपर्क याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी होणाऱ्या कार्यशाळेत साहित्य परिषदेच्या संलग्न विविध शाखांचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि आयोजक सहभागी होणार आहेत. प्रत्येक ठिकाणचे संमेलन स्थानिक वैशिष्ट्य जपत १०० व्या संमेलनाशी जोडले जाईल. समाजातील विविध घटकांच्या साहित्यनिर्मितीला मुख्य प्रवाहात स्थान मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन रविवारी सकाळी १० वाजता पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यशाळेत साहित्य परिषदेशी संबंधित राज्यातील साधारण १७० निमंत्रित व्यक्ती सहभागी होणार आहेत. देशभर होणाऱ्या ९९ साहित्य संमेलनांचे वेळापत्रक, स्थळे आणि कार्यक्रमांची माहिती टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येणार आहे. येत्या १४ ऑगस्ट ते १५ जानेवारी या काळात ही संमेलने होतील, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *