![]()
आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त अभय टिळक यांनी देहू ते आळंदी या १६ किलोमीटरच्या पालखी मार्गाला ‘संतभूमी’ म्हणून घोषित करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय या परिसराला पवित्र मानतो, त्यामुळे या भूमीचे पावित्र्य जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हभप राजू महाराज ढोरे, डॉ. स्वाती मुळे, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जन्म, कर्म आणि निर्वाण भूमी असलेल्या आळंदी, देहू, टाळगाव चिखली आणि तळवडे या पंचक्रोशीला वारकरी ‘संतभूमी’ मानतात. उत्तरांचल सरकारने काही परिसरांना ‘देवभूमी’ म्हणून घोषित करून त्यांचे पावित्र्य जपले आणि विकास केला आहे. त्याच धर्तीवर देहू ते आळंदी हा परिसर ‘संतभूमी’ म्हणून जाहीर करावा, अशी मागणी टिळक यांनी केली. या भूमीची सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक सुरक्षितता अखंड राखण्यासाठी शासनाने विशेष निधी देऊन विकास करावा, अशी विनंती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुरू आहे. हभप राजू महाराज ढोरे यांनी सांगितले की, या १६ किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा किमान १०० मीटर अंतरावरील स्वच्छता राखली जावी. सोमवारपासून सुरू झालेल्या राज्य सरकारच्या अधिवेशनात पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर, पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी ‘संतभूमी’ चा विषय मांडून तो मंजूर करून घ्यावा. पुढील महिन्यात होणाऱ्या पंढरपूर यात्रेपूर्वी महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, विधान परिषद व विधानसभेचे सर्व आमदार, राज्यसभा व लोकसभेचे सर्व खासदार, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना ‘संतभूमी’ जाहीर करण्याबाबत निवेदन दिले जाईल. याबाबत वारकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाईल, असे ढोरे यांनी नमूद केले. डॉ. स्वाती मुळे यांनी वाढत्या नागरीकरणामुळे या भागात गेल्या पंधरा वर्षांत वेगाने शहरीकरण झाल्याचे सांगितले. संतपीठ हायस्कूलसारख्या अनेक शैक्षणिक संस्था या परिसरात कार्यरत असल्याने वाहतूक वाढली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Source link
देहू-आळंदी पालखी मार्ग 'संतभूमी' घोषित करण्याची मागणी:अभय टिळक यांची राज्य सरकारकडे मागणी, अधिवेशनात विषय मंजूर करण्याची विनंती