Headlines

इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर यांचे प्रतिपादन:पर्यावरणासाठी इतिहासातून प्रेरणा घेण्याची गरज




पर्यावरण संवर्धनासाठी केवळ वर्तमानातील उपाययोजनांवर अवलंबून न राहता इतिहासातील पर्यावरणविषयक जाण, परंपरा आणि अनुभवांमधून प्रेरणा घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन वनस्पतीशास्त्रज्ञ, दुर्ग व इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनराई आणि इतिहास प्रबोधन समिती, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इतिहासातील पर्यावरण’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त सागर धारिया होते. नगरसेविका पल्लवी जावळे, पियुष शहा, डॉ. दिलीप शेठ हे यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. गुरुदास नूलकर यांचा सत्कार करण्यात आला. प्र. के. घाणेकर यांनी इतिहास आणि पर्यावरण या संकल्पनांचा उलगडा करताना पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेले सजीव-निर्जीव जग असल्याचे सांगितले. शहर, ग्रामीण भाग, जंगल आणि किल्ल्यांचे पर्यावरण वेगवेगळे असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांवर आढळणारी जैवविविधता, भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये आणि स्थानिक परिसंस्थांचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. राजगड परिसरात आढळणाऱ्या दुर्मिळ ‘डे गेको’ प्रजातीचा उल्लेख करत त्यांनी ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक वारसा यांचे अतूट नाते अधोरेखित केले. सागर धारिया यांनी यावेळी पर्यावरणीय बदलांची चिंताजनक आकडेवारी मांडली. १९५० च्या दशकात १० ते १२ मीटर खोलीवर उपलब्ध असलेले भूजल अनेक ठिकाणी ५० ते ३५० मीटरपर्यंत खाली गेल्याचे त्यांनी सांगितले. वनक्षेत्र वाढल्याचे दिसत असले तरी नैसर्गिक जैवविविधतेच्या परिसंस्था कमी होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच देशातील ४० टक्क्यांहून अधिक पाणथळ क्षेत्रे नष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले. पावसाचे प्रमाण जवळपास समान असले तरी पावसाचे दिवस मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने कमी कालावधीत अतिवृष्टी होत असून त्याचा पर्यावरण आणि शेतीवर विपरीत परिणाम होत असल्याचे धारिया यांनी सांगितले. वाढते शहरीकरण, प्लास्टिक कचरा आणि बदलती जीवनशैली ही भविष्यातील मोठी आव्हाने असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात पर्यावरणपूरक तीन सकारात्मक सवयी अंगीकारून बदलाची सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकात अमित वाडेकर यांनी महाराष्ट्राच्या संतपरंपरेत आणि ऐतिहासिक वारशात पर्यावरण संवर्धनाची समृद्ध परंपरा असल्याचे सांगितले. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी यांच्या विचारांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रांपर्यंत तसेच अहिल्याबाई होळकर आणि पेशवेकालीन जलव्यवस्थापनापर्यंत अनेक उदाहरणांतून पर्यावरण संरक्षणाची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *