![]()
पुण्यात २८ जून २०२६ रोजी ‘समरसता लोककला संमेलन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. लोककलावंत पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन करणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. ही माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. पत्रकार परिषदेला धनंजय खुडे, विलास लांडगे, विजय मोरे, सुनील खंडाळे, रेश्मा मुसळे-परीतेकर, विकास माने, बाळासाहेब मालुसकर आणि जितेंद्र वाईकर उपस्थित होते. संमेलनाची सुरुवात सकाळी ८ वाजता पुणे महानगरपालिका ते बालगंधर्व रंगमंदिर अशी लोककलावंतांच्या भव्य दिंडीने होईल. महापौर मंजूषा नागपुरे यांच्या हस्ते या दिंडीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या दिंडीत गोंधळी, वासुदेव, शाहिर, भारूड, लावणी, दशावतार, आदिवासी नृत्य आणि झाडीपटी यांसारख्या सुमारे २५० लोककलावंतांचा सहभाग असेल. बालगंधर्व रंगमंदिर येथील कला दालनात दुर्मीळ लोकवाद्यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे, ज्याचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होईल. उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी १२ वाजता विशेष मुलाखत सत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये पद्मश्री रघुवीर खेडेकर आणि लोककलावंत नंदेश उमप यांची मुलाखत अभिनेते संदीप पाठक घेतील. दुपारी १ वाजता कवी संमेलन होणार असून त्यात तुकाराम ढोले, प्रा. वा. ना. आंधळे आणि कुमार चव्हाण सहभागी होतील. दुपारी २ वाजता डॉ. प्रवीण चोले, डॉ. प्रशांत पाटील आणि अभिनेत्री जायमाल इनामदार यांच्या सहभागाने चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचा समारोप मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूरचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. समारोपानंतर विविध लोककला सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील, अशी माहिती आयोजकांनी दिली.
Source link
पुण्यात 28 जूनला समरसता लोककला संमेलन:पद्मश्री रघुवीर खेडेकर अध्यक्ष, मुख्यमंत्री फडणवीस करणार उद्घाटन