![]()
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीमुळे तलावाच्या परिसरातील विज पुरवठा खंडीत करून पाणी वाचविण्याचे नियोजन केले जात आहे. तर दुसरीकडे सौरकृषीपंपामुळे आठही जिल्हयाती 1.35 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून या शेतकऱ्यांना दिवसा विज मिळत असल्याने शेती सिंचनाची सोय झाली आहे. तर आता विज कंपनीने मागणी आल्यानंतर तातडीने सौरकृषीपंप देण्याची तयारी चालवली आहे. मराठवाड्यात यावर्षी दुष्काळी परिस्थती आहे. पावसाची सुमारे 35 टक्के तुट असल्यामुळे 44 धरणे व मोठे प्रकल्पासोबतच 800 पेक्षा अधिक लघु तलाव पूर्णक्षमतेने भरलेच नाही. त्यामुळे पाणी पातळीतही वाढ झाली नाही. तर धरण, तलावामध्ये पुरेसे पाणी नसल्याने सध्या आहे त्या पाण्याचे काटकसरीने नियोजन केले जात आहे. पाणी योजनांसोबच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी या तलावांमधून पाणी राखीव ठेवले जात आहे. दरम्यान, तलावातील पाण्याचा अवैधरित्या होणारा उपसा थांबविण्यासाठी जलसंपदा विभाग, जलसंधारण विभागाकडून स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. यापथकाच्या माध्यमातून तलावाच्या परिसरातील विद्युतपंप काढून घेतले जात आहेत. तरी काही ठिकाणी विद्युतपंपाचा विज पुरवठाच खंडीत करून ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या दुष्काळी परिस्थितीत मात्र सौरकृषीपंप बसविलेल्या मराठवाड्यातील आठ जिल्हयातील 1.35 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. विहीर व विंधन विहीरीवर बसविण्यात आलेल्या या सौरकृषीपंपामुळे शेतकऱ्यांना दिवसा व सलग आठ ते दहा तास विज मिळू लागला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी मोठा फायदा झाल्याचे चित्र आहे. त्यानंतर आता विज कंपनीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मागणी केल्यास तातडीने सौरकृषीपंप बसविण्याची तयारी चालवली आहे. परभणी जिल्ह्यात सर्वात जास्त सौर कृषीपंप मराठवाड्यात परभणी जिल्हयात सर्वात जास्त 37121 शेतकऱ्यांनी सौरकृषीपंप बसविले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हयात 13885, बीड 25107, जालना 8504, धाराशिव 8209, लातुर 5064, हिंगोली 25051 तर नांदेड जिल्हयात 12 हजार 622 शेतकऱ्यांनी सौरकृषीपंप बसविले आहेत. मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेचे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून 30 टक्के तर राज्य सरकारकडून 60 टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषीपंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. अशी आहे पंप मजूरीची प्रक्रिया मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेत शेतकऱ्यांनी पंपासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर महावितरणकडून अर्ज मंजूर केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याने त्याचा हिस्सा भरायचा असतो. शेतकऱ्याकडून पंप बसविण्यासाठी एजन्सीची निवड केली जाते. पंप बसविण्याच्या ठिकाणाची महावितरण, एजन्सी व शेतकरी अशी तिघांकडून संयुक्त पाहणी केली जाते, त्यानंतर कार्यादेश एजन्सीला दिला जातो आणि शेतात पंप बसविला जातो. पंप बसविणाऱ्या एजन्सीवर पुढील काळासाठी देखभाल दुरूस्तीचीही जबाबदारी आहे. चारापिकांसाठी सौरकृषी पंप असलेल्या शेतकऱ्यांचा आधार घेणार मराठवाड्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून चारावर्गीय पिके घेतली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सौरकृषीपंप आहे त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चारा पिके घेण्याची तयारी पशुसंवर्धन विभागाने चालवली आहे. त्यासाठी या शेतकऱ्यांची माहितीही मागविण्यात आली आहे.
Source link
मागेल त्याला सौरपंप!:दुष्काळी परिस्थितीतही मराठवाड्यातील 1.35 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दिवसा वीज पुरवठ्यामुळे सिंचनाचा प्रश्न सुटला