Headlines

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरवर छापा; 20 जणांना अटक:परदेशी नागरिकांची फसवणूक करत होते, 36 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त




परदेशी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी चालविल्या जाणाऱ्या बेकायदा कॉल सेंटरवर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून 20 जणांना अटक केली. या कारवाईत मोबाईल, लॅपटॉप, रोकड आणि चारचाकी वाहन असा एकूण 36 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील नांगारगाव येथील ओमेगा सोसायटीमधील ‘देव व्हिला’ बंगल्यात काही व्यक्ती एकत्र येऊन बेकायदा कॉल सेंटर चालवत असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने संबंधित बंगल्यावर छापा टाकला. पोलिसांनी पंचांसमक्ष बंगल्यात प्रवेश केला असता, हॉलमध्ये काही जण हेडफोन लावून लॅपटॉप आणि मोबाईलच्या साहाय्याने इंग्रजीत संभाषण व चॅटिंग करताना आढळले. लगतच्या बेडरूममध्येही अशाच प्रकारे काम सुरू होते. चौकशीदरम्यान संबंधितांनी तेथे कॉल सेंटर सुरू असल्याचे सांगितले. मात्र, अधिकृत परवान्याची मागणी केल्यानंतर समाधानकारक कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत, असे पोलिसांनी म्हटले आहे. विविध योजनांचे आमिष आरोपी विविध ॲपच्या माध्यमातून इंटरनेट कॉल करून अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांशी संपर्क साधत होते. ॲमेझॉन, गुगल यांसारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून विविध योजनांचे आमिष दाखविले जात होते. त्यानंतर संबंधितांचा बँक तपशील, क्रेडिट कार्ड आणि एटीएम कार्डची माहिती मिळवून बनावट बँकसंबंधित कागदपत्रे तयार केली जात असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. काही नागरिकांना त्यांच्या नावाने मागविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून भीती दाखविली जात होती, असेही पोलिसांनी नमूद केले. या पद्धतीने परदेशी नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप असून, जप्त केलेल्या उपकरणांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि इंडियन टेलिग्राफ कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, ते सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक महेश विधाते आणि दोन्ही पथकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश विधाते करीत आहेत. जप्त मुद्देमालामध्ये कॉल सेंटरसाठी वापरले जाणारे मोबाईल फोन आणि लॅपटॉप यांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ——— हेही वाचा.. पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांना लुटले:खडक आणि विमानतळ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे शहरात वेगवेगळ्या घटनेत दोघांना लुटण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक आणि विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. विमाननगर भागात दुचाकीस्वाराला धमकावून त्याच्याकडील रोकड आणि लॅपटॉप असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *