Headlines

धीरेंद्र शास्त्रींचे आवाहन: 'चारपैकी एक मूल संघाला द्या':लोकसंख्या वाढीच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता




नागपूर येथे बागेश्वरधामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी देशभक्तीचा संदेश देताना ‘चार मुले जन्माला घाला आणि त्यापैकी एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या,’ असे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेद्वारा उभारण्यात येणाऱ्या ‘भारतदुर्गा मंदिर’च्या शिलान्यास कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शास्त्री यांनी हिंदूंना लोकसंख्या वाढवण्याचे आवाहन केले. गेल्या काही दिवसांपासून सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी नेते आणि धार्मिक गुरू हिंदूंनी आपली लोकसंख्या वाढवली नाही, तर भविष्यात अस्तित्व धोक्यात येईल, असे सांगत किमान तीन ते चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन करत आहेत. या पार्श्वभूमीवर धीरेंद्र शास्त्री यांचे हे आवाहन महत्त्वाचे मानले जात आहे. याच कार्यक्रमात धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील गुरु-शिष्य नात्यावरही भाष्य केले. ‘भारतदुर्गा मंदिर’ पूर्ण झाल्यावर भारत अखंड होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, याच कार्यक्रमात गोविंददेव गिरीजी महाराज यांनीही आक्रमक भूमिका घेत समाजाला थेट आवाहन केले. त्यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील वासनाकांडाविरोधात लोकांनी पेटून उठले पाहिजे, असे म्हटले. गिरीजी महाराज म्हणाले, “आपल्या संस्कृतीवर, भाषेवर आणि परंपरांवर होणाऱ्या आक्रमणाविरुद्ध उग्र भूमिका घेण्याची वेळ आली आहे.” ते पुढे म्हणाले की, “कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सुरू असलेले अत्यंत भीषण वासनाकांड पाहून कोणाला राग येत नसेल, तर तुम्ही माणूस आहात की मुर्दा याचा विचार करायला पाहिजे.” आई-बहिणींची होत असलेली दुर्दशा पाहूनही राग येत नसेल, तर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या विधानांमुळे सभेतील वातावरण अधिकच तापले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *