Headlines

पालखी प्रस्थाननंतर आळंदीत युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम:मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या माहितीनुसार निर्जंतुकीकरणही सुरू




संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर, आळंदी नगरपरिषदेमार्फत संपूर्ण शहरात युद्धपातळीवर स्वच्छता व निर्जंतुकीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी ही माहिती दिली. पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नगर परिषदेने मध्यरात्रीच्या वेळेत साफसफाई, कचरा संकलन व वाहतुकीची कामे सातत्याने केली. दिंड्यांच्या मुक्कामाची ठिकाणे, जर्मन हँगर आणि मोबाईल शौचालयांची व्यवस्था असलेल्या सर्व परिसरांची तात्काळ स्वच्छता करून ते पूर्ववत करण्यात आले. सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा संकलनाचे काम सुरू आहे. अलीकडील पूरपरिस्थितीमुळे घाट परिसरात व नदीकाठावर साचलेला गाळ, कचरा व जलपर्णी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी सुमारे ४०० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, जेसीबीच्या सहाय्याने जलपर्णी व गाळ काढला जात आहे. यासोबतच शहरात निर्जंतुकीकरणासाठी जंतुनाशक औषधे व बीएचसी पावडर फवारण्यात येत आहे. दुर्गंधी दूर करण्यासाठी आवश्यक औषधांचीही फवारणी केली जात आहे. रस्त्यांवर साचलेला गाळ व कचरा हटवून अग्निशमन दलाच्या वाहनांच्या सहाय्याने रस्ते धुऊन स्वच्छ करण्यात येत आहेत. पुरामुळे अनेक दुकाने व व्यावसायिक आस्थापनांमध्ये गाळ साचला होता. अशा ठिकाणीही नगर परिषदेमार्फत स्वच्छता करण्यात येत असून, दुर्गंधी दूर करण्यासाठी ओडोफ्रेशसह आवश्यक औषधांची फवारणी केली जात आहे. शहरातील सर्व प्रकारचा कचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे कामही सुरू आहे. विशेष म्हणजे, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाचा मार्ग पूर्णपणे स्वच्छ, सुरक्षित व अडथळामुक्त राहावा यासाठी संपूर्ण पालखी मार्ग रातोरात स्वच्छ करण्यात आला. नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता व सार्वजनिक सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य देत आळंदी नगर परिषद सर्व आवश्यक उपाययोजना सातत्याने राबवित आहे. नगराध्यक्ष प्रशांत कुराडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर तसेच स्वच्छता निरीक्षक दत्ता गायकवाड यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शन व देखरेखीखाली ही सर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. शहरातील जनजीवन लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी नगर परिषद प्रयत्नशील आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *