![]()
छत्रपती संभाजीनगर येथे पाणीपुरवठ्याबाबत महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी कडक निर्देश दिले आहेत. उद्या सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठ्याची पंपिंग सुरू झालीच पाहिजे, असे त्यांनी संबंधित एजन्सी आणि अधिकाऱ्यांना बजावले. कामात कोणतीही दिरंगाई किंवा सबबी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. आज स्मार्ट सिटी कार्यालयात आयुक्त येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठ्याच्या सखोल आढाव्यासाठी एक महत्त्वाची बैठक पार पडली. सध्या बंद असलेली पंपिंग आणि जॅकवेल मेंटेनन्सच्या कामावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. कामाचा वेग वाढवण्यासाठी आयुक्तांनी थेट कृती आराखडा दिला. आज संध्याकाळीच एजन्सी, एमजेपीचे अधिकारी आणि महापालिकेच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. रात्रीच नवीन व्हॉल्व बदलून पंपिंग सुरू करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. रात्री प्रकाशाअभावी काम शक्य नसल्यास, उद्या सकाळी सूर्योदय होताच काम सुरू करून दुपारी १२ च्या आत पंपिंग सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. बैठकीदरम्यान एजन्सीच्या प्रतिनिधींनी कामातील विलंबाची कारणे देण्याचा प्रयत्न केला. त्यावर आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत एजन्सीला फटकारले. “तुमची डेडलाईन आधीच संपली आहे, त्यामुळे आता मला कोणतीही कारणे सांगू नका. आधी काम पूर्ण करा,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले. तसेच ‘एप्रोच चॅनेल’चे कामही तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पुढील कामांचे नियोजन करताना आयुक्तांनी काही महत्त्वाचे निर्देश दिले. नवीन व्हॉल्वच्या ऑर्डरची तपासणी करून ते वेळेतच येतील याची खात्री करावी. ज्या ठिकाणचे व्हॉल्व खराब आहेत, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित एजन्सीची राहील. नवीन व्हॉल्व आल्यानंतर ते बदलण्याचे काम पुढील पाच दिवसांतच पूर्ण करावे. यासाठी रीतसर ‘शट डाऊन’ घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आढावा बैठकीला विशेष कार्यकारी अधिकारी ए.बी. देशमुख, के.एम. फालक, अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे, कार्यकारी अभियंता सचिन वाईकर, सर्व कनिष्ठ अभियंता, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार रामधन जाधव, योगेश काळे, तसेच GVPR चे सिद्धांत ठाकरे, आशुतोष पांडेय आणि एमजेपी चे राम नारायण आदी अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
Source link
पाणीपुरवठा पंपिंग उद्या सकाळी सुरू करा:दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, मनपा आयुक्त अमोल येडगे यांचे कडक निर्देश