Headlines

ध्यास शिक्षणाचा:ओस पडलेली रूपलाचा तांडा जिल्हा परिषद शाळा बनली शिक्षणाची मॉडेल




शिक्षक, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या सामूहिक प्रयत्नातून दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेचा चेहरामोहरा कसा बदलू शकतो, याचं बोलकं आणि प्रेरणादायी उदाहरण पाथर्डी तालुक्यातील ‘रूपलाचा तांडा’ या जिल्हा परिषद शाळेने घालून दिलं आहे. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांअभावी ओस पडलेली ही शाळा आता चिमुकल्यांचा किलबिलाटा अन् उत्साहाने बहरली आहे. ६ महिन्यांपूर्वी या शाळेवर जयराम सातपुते आणि दीपा सातपुते या शिक्षक दाम्पत्याची बदली झाली. उदरनिर्वाह आणि शिक्षणासाठी गावकऱ्यांनी स्थलांतर केल्यामुळे शाळेत अवघे २ विद्यार्थी उरले होते. शाळा शेवटच्या घटका मोजत होती. सातपुते दाम्पत्याने हार न मानता गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी अंगणवाडीतील व उपलब्ध मुलांवर विविध आधुनिक शैक्षणिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. मुलांमधील बदल पाहून पालकांचा विश्वास वाढला. आपल्या तांड्यातच इंग्रजी माध्यमापेक्षा उच्च दर्जाचे शिक्षण मिळत असल्याने, स्थलांतरित झालेल्या पालकांचे पाय पुन्हा तांड्याकडे वळू लागले आहेत. बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या या शाळेत आज १४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, हे पाहून आनंद झाला. शिक्षकांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांच्या सहकार्याची जोड मिळाली, तर अशक्य काहीच नाही हेच या शाळेने दाखवून दिले आहे, असे पाथर्डीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी सांगितले. तांड्यापासून ३-४ किमी अंतरावरील दुर्गम भिल्ल वस्तीतील मुले शिक्षणापासून वंचित होती. पालक सकाळीच मासेमारी किंवा मजुरीला जात असल्याने वाहतुकीची मोठी अडचण होती. ही अडचण ओळखून सातपुते दाम्पत्याने या मुलांना स्वतःच्या गाडीतून शाळेत आणण्याची आणि सोडण्याची जबाबदारी स्वीकारली. शिक्षकांच्या या संवेदनशीलतेमुळे पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आज या शाळेत आणखी १२ नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पटसंख्या १४ झाली आहे. गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, केंद्रप्रमुख बाळासाहेब पोळ, माजी सरपंच विजय राठोड, उपसरपंच किशोर राठोड, ग्रामसेवक गोपीचंद रोंधे व ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे ही शाळा ग्रामीण भागासाठी ‘मॉडेल’ बनत आहे. दुर्गम भागातील लेकरांसाठी स्वतःची गाडी इंग्रजी माध्यमापेक्षा माझी शाळा भारी ^ भविष्यातील स्पर्धा पाहून आम्ही मुलाला इंग्लिश मीडियमला टाकणार होतो. पण रूपलातांडा जि.प. शाळेतील शिक्षणाची माहिती मिळताच आम्ही निर्णय बदलला. अवघ्या दोन महिन्यांत माझ्या मुलात झालेली शैक्षणिक प्रगती शब्दांत व्यक्त करता येणार नाही इतकी सुंदर आहे. अभिमन्यू चितळे, पालक, धनगरवाडी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *