![]()
नाशिक शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शुक्रवारी काहीशी विश्रांती घेतली असली, तरी धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. गंगापूर धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आला आहे. परिणामी, रामकुंड परिसरातील ऐतिहासिक ‘दुतोंड्या मारुती’ची मूर्ती पूर्णपणे पाण्याखाली गेली असून पुराचे पाणी शहरातल्या मुख्य बाजारपेठांमध्ये शिरले आहे. गंगापूर धरणातून विसर्गात वाढ; बाजारपेठेत पाणी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजता धरणातून होणाऱ्या विसर्गात ४७५ क्यूसेकने वाढ केली. सध्या गंगापूर धरणातून तब्बल १४,४०७ क्यूसेक वेगाने गोदापात्रात पाणी सोडले जात आहे. पाण्याचा हा विसर्ग वाढल्यामुळे गुरुवारी सायंकाळी ‘दुतोंड्या मारुती’च्या मानेपर्यंत असलेले पाणी शुक्रवारी संपूर्ण मूर्तीवर गेले असून मारुतीची मूर्ती पूर्णपणे बुडाली आहे. पुराचे पाणी नदीकाठच्या प्रसिद्ध भांडी बाजार आणि सराफ बाजारात शिरले आहे. गोदापात्रातील अनेक छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली असून रामसेतू पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. ग्रामीण भागातही पूरस्थिती; टपरीचालकांचे नुकसान शहराव्यतिरिक्त ग्रामीण भागातही पुराचा फटका बसला आहे. निफाड तालुक्यातील चांदोरी गावामध्ये गोदावरीचे पाणी शिरले आहे. पाणीपातळी अतिशय वेगाने वाढल्यामुळे नदीकाठच्या अनेक लहान-मोठ्या विक्रेत्यांना आणि हातगाडीधारकांना आपले साहित्य हलवण्यास वेळ मिळाला नाही, त्यामुळे त्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, नागरिकांनी पुराच्या ठिकाणी विनाकारण गर्दी न करता योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हेही वाचा.. राज्यात पावसाचा जोर वाढला: घाटमाथ्यावर रेड अलर्ट, नाशिक-पालघरमध्ये पूरस्थिती; अनेक गावांचा संपर्क तुटला राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले आहे. हवामान विभागाने पुणे, नाशिक आणि कोकणातील जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड आणि ऑरेंज अलर्ट) दिला आहे. सविस्तर वाचा
Source link
नाशिकमध्ये पुराचा हाहाकार:'दुतोंड्या मारुती' संपूर्ण पाण्याखाली; गंगापूर धरणातून 14,407 क्यूसेकने विसर्ग सुरू