Headlines

निरागस हास्याने खुलली राखीपौर्णिमा:विशेष मुलांसोबत टीव्ही कलाकारांनी साजरा केला प्रेमाचा सण




मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण करणाऱ्या ‘सन मराठी’ वाहिनीने सामाजिक बांधिलकी जपत यंदाची राखीपौर्णिमा विशेष मुलांसोबत साजरी केली. परळ येथील श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नरेपार्क विशेष मुलांच्या शाळेला ‘सन मराठी’च्या कलाकारांनी भेट दिली. यावेळी कलाकारांनी मुलांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत, त्यांच्यासोबत वेळ घालवत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत राखीपौर्णिमेचा सण अधिक खास केला. या उपक्रमात ‘मी संसार माझा रेखिते’ मालिकेतील अनुप्रिया म्हणजेच अभिनेत्री दीप्ती केतकर, ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेतील समीर-अर्पिता म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता अंबर गणपुले, तसेच ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ मालिकेतील वृंदा-मोहन म्हणजेच अभिनेत्री स्वाती भिंगारदिवे आणि अभिनेता संग्राम समेळ सहभागी झाले होते. कलाकारांच्या भेटीमुळे शाळेतील वातावरणात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुलांच्या हातून बांधली प्रेमाची राखी या भेटीतील सर्वात भावूक आणि खास क्षण म्हणजे विशेष मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या कलाकारांच्या मनगटावर बांधल्या. मुलांनी मोठ्या प्रेमाने आणि उत्साहाने कलाकारांना राख्या बांधल्या. कलाकारांनीही मुलांना भेटवस्तू देत त्यांचा आनंद द्विगुणित केला. मुलांनी स्वतः तयार केलेल्या राख्यांमागील मेहनत आणि त्यांची कला पाहून कलाकारांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. राखी बांधतानाचे हे क्षण केवळ सणापुरते मर्यादित न राहता प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचा सुंदर अनुभव देणारे ठरले. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य आणि कलाकारांसोबतचा त्यांचा उत्साह पाहून उपस्थित कलाकारही भावूक झाले. ‘छोट्या छोट्या गोष्टींमध्येही खरा आनंद दडलेला असतो’ या अनोख्या राखीपौर्णिमेचा अनुभव सांगताना अभिनेत्री योगिता चव्हाण भावूक झाली. ती म्हणाली, “आपण आजकाल एका अशा जगात जगतोय, जिथे अनेक गोष्टी खऱ्या असण्यापेक्षा दाखवण्यासाठी केल्या जातात. त्यामुळे मनापासून व्यक्त होणाऱ्या, कोणताही स्वार्थ नसलेल्या आणि अगदी निखळ अशा भावनांची आपल्याला फारशी सवय राहिलेली नाही. या मुलांना भेटल्यानंतर मात्र काही क्षणांसाठी हे सगळं विसरून त्यांच्यासोबत खूप सुंदर आणि मनापासूनचे क्षण अनुभवता आले.” “त्यांच्यासोबत वेळ घालवताना जाणवलं की, आनंद मिळवण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या गोष्टींची गरज नसते. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही खरा आनंद दडलेला असतो. त्यांच्या निरागसपणाने आणि प्रेमाने मनाला खूप स्पर्श केला,” असेही योगिताने सांगितले. ‘आमच्या येण्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं, हेच महत्त्वाचं’ या भेटीबद्दल पुढे बोलताना योगिता चव्हाण म्हणाली, “या मुलांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत हे काही क्षण घालवण्याची संधी मिळाली, यासाठी देवाचे आणि सन मराठीच्या टीमचे मनापासून आभार. आम्हाला आनंद झाला की नाही, यापेक्षा आमच्या येण्याने या मुलांना किती आनंद झाला असेल, त्यांच्या चेहऱ्यावर काही वेळासाठी का होईना, पण हसू आलं असेल, हा विचारच आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे.” “त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून आम्हाला मिळालेलं समाधान शब्दांत सांगणं खरंच कठीण आहे. कदाचित आमच्यासाठी हा फक्त काही तासांचा अनुभव असेल, पण आमच्या या छोट्याशा भेटीने त्यांच्या आयुष्यातला एखादा सुंदर क्षण तयार झाला असेल, तर त्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्यासाठी दुसरी कोणतीच नाही,” असे योगिताने सांगितले. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आणि विशेष मुलांमध्ये आपुलकीचा सुंदर बंध निर्माण झाला. मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या, कलाकारांनी दिलेल्या भेटवस्तू आणि एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण यामुळे यंदाची राखीपौर्णिमा या शाळेतील मुलांसाठी तसेच कलाकारांसाठीही कायमची आठवण ठरली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *