![]()
नेवासे लग्नसमारंभासाठी जावयाला सासुरवाडीतून निमंत्रण जाणे ही तशी सर्वसामान्य बाब. मात्र, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या थेट जेजुरीच्या खंडोबारायांना त्यांच्या सासुरवाडीतून जेजुरीत जाऊन धोंडा भोजनाचे निमंत्रण देण्याची एक अनोखी आणि रंजक परंपरा नेवासे बुद्रुक येथे आजही मोठ्या भक्तीभावाने जपली जात आहे. अधिक पुरुषोत्तम मासनिमित्त शनिवारी (१३ जून) आयोजित धोंडा भोजन सोहळ्यासाठी खंडेरायांच्या चरणी नेवासेकरांच्या वतीने निमंत्रण पत्रिका अर्पण करण्यात आल्या. नेवासे बुद्रुक हे खंडोबारायांच्या पत्नी म्हाळसादेवी यांचे माहेर मानले जाते. त्यामुळे जावई या नात्याने खंडोबारायांना दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात (धोंड्याच्या महिन्यात) धोंडा भोजनासाठी विशेष निमंत्रण देण्याची जुनी परंपरा आहे. यंदाही पुरातन म्हाळसा खंडोबा बाणाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष संभाजीराव ठाणगे, विश्वस्त राजेंद्र काशीद आणि प्रसिद्धी प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण यांनी जेजुरी गाठून खंडेरायांच्या चरणी ही निमंत्रण पत्रिका अर्पण केली. यावेळी वेदमंत्रांच्या जयघोषात खंडोबारायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. पुजारी निीलेश बारभाई यांनी पौरोहित्य केले. याप्रसंगी श्री मार्तंड देवस्थान जेजुरी पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, पालखी मानकरी सोमनाथ शेवाळे, देवस्थान कर्मचारी कल्याण चव्हाण, महेश शिंदे आदी उपस्थित होते. देवस्थान विश्वस्त मंडळ व प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही यावेळी निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या. नेवासे बुद्रुक येथील धोंडा कार्यक्रमानिमित्त केवळ देवांनाच नव्हे, तर परिसरातील नवनवीन विवाहबद्ध झालेल्या लेकी-जावयांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता मंदिर प्रांगणात वेदमंत्रोच्चारात अभिषेक आणि तळी-भंडार केला जाईल. देवाला पंचपक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करून उपस्थित भाविकांना धोंडा भोजनाचा (धोंडे) प्रसाद दिला जाईल. सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या जावईबापूंचा मंदिर समितीच्या वतीने विशेष सन्मान केला जाणार आहे. धोंडा भोजनासाठी खंडेरायाला जेजुरी येथे जाऊन विशेष निमंत्रण देण्यात आले. नेवाशात चंपाषष्ठीला असतो भरीतअन् भाकरीचा बेत नेवासे बुद्रुक येथे चंपाषष्ठी उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चंपाषष्ठीला खंडोबादेव सासुरवाडीत जेवण्यासाठी येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या दिवशी देवांना प्रिय असलेले वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य अर्पण केला जातो. देवांच्या आगमनाचे प्रतीक म्हणून पालखी सोहळा व घोड्याची मिरवणूक काढण्याची परंपराही येथे आजही पाळली जाते. या अनोख्या धार्मिक परंपरेमुळे नेवासा बुद्रुक हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान बनले आहे.
Source link
नेवाशात उद्या रंगणार सोहळा:खंडोबारायांना सासुरवाडीतून धोंड्याचे जेवण; नेवाशात जपली जातेय परंपरा