![]()
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. आगामी ३० जून २०२४ पर्यंत हे प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास लाभार्थी पुढील हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतात, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. केंद्र व राज्य शासनाने योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच योजनेचा लाभ पोहोचावा, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी शेतकरी नजीकच्या सामायिक सुविधा केंद्रावर (CSC) जाऊ शकतात. तसेच, शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर ‘पीएम-किसान’ मोबाईल ॲप डाऊनलोड करून चेहऱ्याद्वारे (फेस ऑथेंटिकेशन) ई-केवायसी पूर्ण करू शकतील, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कोणतीही अडचण टाळण्यासाठी ३० जूनपूर्वी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन पीएम किसानचे जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे. वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग लाभार्थी ज्यांना केंद्रावर जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी अशा शेतकऱ्यांकडे वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन ‘फेस ऑथेंटिकेशन’द्वारे त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करतील.
Source link
पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य:३० जूनपर्यंत न केल्यास लाभापासून वंचित राहण्याची शक्यता