Headlines

हिंगोलीत मसोड फाटा शिवारात तरुणाचा मृतदेह आढळला:गळफास की घातपात? पोलिसांचा तपास सुरू




कळमनुरी तालुक्यातील मसोड फाटा शिवारात ढोलक्याचीवाडी येथील तरुणाचा मृतदेह (मंगळवारी ता. १४) दुपारी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे. कळमनुरी पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी येथील तरुण प्रविण खुडे (२१) हा हिंगोली येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. आज दुपारच्या सुमारास ते दुचाकी वाहनाने गावाकडून हिंगोलीकडे निघाला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास कळमनुरी ते हिंगोली मार्गावर मसोडफाटा शिवारात त्याचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जमीर नाईक, जमादार बबन देवकर, क्षिरसागर, गजानन होळकर, लक्ष्मीकांत माखणे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मयत प्रविण याचे कुटुंबिय देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिस व ढोलक्याचीवाडी येथील गावकऱ्यांनी प्रविणचा मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. दरम्यान, प्रविण याने गळफास घेतला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात असून त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतरच प्रविण याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असून त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रविण याच्या पश्‍चात आई, वडील, दोन बहिणी असून तो घरात एकुलता एक होता. त्याच्या मृत्यूमुळे खुडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ढोलक्याचीवाडी गावावर शोककळा पसरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *