Headlines

पुणे जिल्ह्यात मुसळधार:खडकवासला धरण प्रणालीत 66% पाणीसाठा, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा




पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी सकाळी खडकवासला धरण प्रणालीमध्ये एकूण 19.27 टीएमसी म्हणजेच 66 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रणालीची एकूण उपयुक्त साठवण क्षमता 29.15 टीएमसी आहे. खडकवासला धरण प्रणालीतील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. खडकवासला धरणात 1.43 टीएमसी (73 टक्के), पानशेतमध्ये 7.56 टीएमसी (71 टक्के), वरसगावमध्ये 8.47 टीएमसी (66 टक्के), तर टेमघरमध्ये 1.81 टीएमसी (49 टक्के) साठा नोंदविण्यात आला. या धरणांमध्ये पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खडकवासला धरणात 8,851 क्यूसेक, पानशेतमध्ये 4,606 क्यूसेक, वरसगावमध्ये 6,319 क्यूसेक आणि टेमघरमध्ये 920 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. आवक वाढत असल्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून लवकरच विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय, मुळशी धरण 81 टक्के भरले असून मुळा नदीत एक हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. मावळ तालुक्यातील वडीवळे धरण 99.60 टक्के भरल्याने त्याचा विसर्ग 3,592 क्यूसेकवरून 4,704 क्यूसेक करण्यात आला आहे. चासकमान धरणही 94.29 टक्के भरले असून भीमा नदीत 3,500 क्यूसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यासाठी बुधवारी येलो अलर्ट दिलेला असून जिल्ह्यांमधील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. पावसाची तीव्रता आणि धरणांमधील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गात बदल होऊ शकतो. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये तसेच जनावरे, वाहने, पंप आणि शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *