Headlines

पुणे 2030 पर्यंत देशाचे 'ग्रोथ इंजिन' बनेल:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; 3 उन्नत मार्गांचे भूमिपूजन




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, पुणे शहर २०२३ पर्यंत देशाचे प्रमुख विकास केंद्र (ग्रोथ इंजिन) बनेल. हे शहर भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) मुख्य केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य शासनाने पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन महत्त्वाच्या उन्नत मार्ग प्रकल्पांना गती दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) माध्यमातून ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (BOT) तत्त्वावर हे प्रकल्प राबवले जात आहेत. या प्रकल्पांमुळे शासनाला अनुक्रमे ५००, ३०० आणि १५० कोटी रुपये असा एकूण ९५० कोटी रुपयांचा आगाऊ निधी मिळणार आहे. हे उन्नत मार्ग पुण्याची वाहतूक कोंडीची समस्या दूर करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन उन्नत मार्गांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या तीन प्रकल्पांमुळे पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर, विशेषतः औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांवरील समस्येवर कायमस्वरूपी उपाय मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीचा विचार करून या तिन्ही उन्नत मार्गांवरून पुढे मेट्रो नेण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या उन्नत मार्गांवर भविष्यात मेट्रो मार्गिका उभारण्यासाठी आवश्यक डिझाइन आतापासूनच तयार करण्यात आले आहे. यामुळे मेट्रोचे काम सुरू झाल्यावर कोणताही अडथळा येणार नाही आणि या एकत्रित रचनेमुळे मेट्रोच्या खर्चात किमान ४० टक्क्यांची बचत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नव्या पुरंदर विमानतळाशी जोडणी (कनेक्टिव्हिटी) वाढवण्यावरही शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दिवेघाटामध्ये दुहेरी बोगदा तयार करून त्यातून रस्ता व मेट्रो नेल्यास पुरंदर विमानतळावर पोहोचण्याचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि विनाअडथळा प्रवास शक्य होईल, या दृष्टीने विचार सुरू आहे. या विमानतळासाठी ५० टक्क्यांहून अधिक भूसंपादन पूर्ण झाले आहे. देशाच्या इतिहासात इतक्या वेगाने भूसंपादन होण्याचा हा विक्रम असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच १७३ किलोमीटरचा बाह्य व ८६ किलोमीटरचा अंतर्गत वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून यामुळे शहरातील वाहतूक कोंडी ३० टक्क्यांनी कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.पुणे व पीएमआरडीए क्षेत्राच्या पुढील ३० ते ४० वर्षांच्या विकासाचा विचार करताना पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले. वाढती लोकसंख्या लक्षात घेता केवळ पाण्याचे नवे स्रोत शोधण्यावर अवलंबून न राहता, वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर शासनाने भर दिला आहे. जायका व जागतिक बँकेच्या सहकार्याने अनेक जलशुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारण्यात येत असून, नद्या व तलावांना प्रदूषित करणारे शहरी सांडपाणी शुद्ध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. पुणे शहर हे अभियांत्रिकी व नवउद्यमांचे (स्टार्टअप) प्रमुख केंद्र असून पुढील काळात ते अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) व जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख हब बनेल. देशातील एकूण जीसीसीपैकी जवळपास ३५ टक्के केंद्रे एकट्या पुण्यात उभी राहत आहेत. इतर शहरांसारखी पुण्याची वाहतूक कोंडीची अवस्था होऊ नये, यासाठी हे सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण केले जातील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून ६७० किलोमीटरचे उत्कृष्ट रस्ते तयार करण्यात आले आहेत. आता ग्रँड टूरला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यामुळे पुण्याला केवळ जागतिक नकाशावरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावरही स्थान मिळाले आहे. त्यामुळे हे कामही अतिशय वेगाने पुढे नेणार आहोत. त्याचबरोबर पुणे शहरातील १३० किलोमीटर रस्त्यांचे उन्नतीकरण करण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *