Headlines

पुण्यात समलैंगिक पतीकडून महिलेचा छळ:पतीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल




पुणे येथे एका महिलेने तिच्या समलैंगिक पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध शारीरिक व मानसिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ही फिर्याद नोंदवण्यात आली आहे. फिर्यादी ४४ वर्षीय महिलेचा विवाह २००६ मध्ये आरोपी पतीशी झाला होता. पती समलैंगिक असल्याची बाब त्याच्या कुटुंबीयांनी लग्नापूर्वी लपवून ठेवली होती, असा आरोप महिलेने केला आहे. विवाहानंतर काही काळानंतर महिलेला पती समलैंगिक असल्याचे आणि त्याचे परपुरुषांशी संबंध असल्याचे निदर्शनास आले. पती परपुरुषांना घरी बोलावू लागला. जेव्हा महिलेने यावर आक्षेप घेतला, तेव्हा तिला आणि तिच्या मुलाला घरातून बाहेर काढण्याची धमकी देण्यात आली. “तू जर तक्रार दिली तर घरात राहायचे नाही, तू घर सोडून जा,” अशी धमकी तिला देण्यात आली. यामुळे मुलाच्या भवितव्याची चिंता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी पती, सासू, जाऊ आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक राखी कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. लोणी काळभोरमध्ये अशीच घटना दरम्यान, लोणी काळभोर येथेही एका महिलेने पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध शारीरिक व मानसिक छळ तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. ही फिर्याद लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार गावचा रहिवासी असून, तो सध्या पिरंगुट परिसरात नोकरी करतो. विवाहानंतर महिला आणि पती पिरंगुट परिसरात राहत होते. महिलेने तिच्या फिर्यादीत लग्नानंतर शारीरिक आणि मानसिक छळ करून काठीने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट या प्रकरणाचा तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *