Headlines

पैठणला 35 मिनिटे वाऱ्यासह पाऊस; 12 झाडे उन्मळली:तीन जण जखमी, काही घरांवरील पत्रे उडाले, धान्य मार्केट परिसरामध्ये पाणी तुंबले‎




गेल्या काही दिवसांपासून उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या पैठणकरांना अखेर सोमवारी दिलासा दिला. दुपारी चारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन आलेल्या या पहिल्याच पावसाने वादळी वाऱ्यासह शहराला झोडपून काढले. अवघ्या ३५ मिनिटांत झालेल्या या वादळी पावसामुळे शहरात १२ झाडे कोसळली असून, काही घरांवरील पत्रे उडाल्याने पडझड झाली आहे. या दुर्घटनेत ३ जण जखमी झाले असून शहराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. पंचायत समितीसमोर एक, तर कहारवाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ वडाचे झाड कोसळले. एसटी बसस्थानक परिसर आणि धान्य मार्केट परिसरात गटारे तुंबल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. अनेक दुकानांत पावसाचे पाणी शिरून व्यापाऱ्यांची मोठी धांदल उडाली. दरम्यान, पहिल्याच पावसाने पैठण शहर आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. वादळामुळे ठिकठिकाणी तारा तुटल्याने रात्री उशिरापर्यंत शहर अंधारात असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. वादळाचा मोठा फटका मोक्षघाट परिसराला बसला. येथे झाड कोसळल्याने पत्राच्या शेडमध्ये राहणारे अजय लिंबोरे, प्रतिम लिंबोरे, कमलाबाई लिंबोरे, कमळबाई लिंबोरे आणि उमेश लिंबोरे हे सर्वजण अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक बजरंग लिंबोरे आणि भूषण कावसानकर यांनी धाव घेत या सर्वांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, या पडझडीत रोहन बल्लाया, सविता बल्लाया, अजय लिंबोरे आणि राणी लिंबोरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शहरात ३५ मिनिटे दमदार पाऊस झाला असताना, ग्रामीण भागातील जायकवाडी, पिंपळवाडी आणि कारखाना परिसरात मात्र पाचच मिनिटे रिमझिम पाऊस झाला. ग्रामीण भागात ढगाळ वातावरण आणि विजांचा कडकडाट झाल्याने तेथे उकाडा वाढला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर या पावसाने हजेरी लावल्याने जमिनीत ओलावा आहे. फर्दापूर परिसरात सोमवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाळ्यातील या पहिल्याच पावसाने २० मिनिटे जोरदार बॅटिंग केली. या दमदार पावसामुळे परिसरातील रस्ते आणि शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ^पैठण शहरात वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे पडली आहेत. नागरिकांनी वादळ-वारा सुरू असताना कोणत्याही झाडाखाली उभे राहू नये आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. – पल्लवी अंभोरे मुख्याधिकारी, पैठण, नगरपालिका वादळी वाऱ्याचा मोठा फटका पैठण शहरातील मोक्षघाट परिसरास बसला नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा पैठण शहरात पाऊस तर ग्रामीण भागात उकाड्याची स्थिती कायम



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *