Headlines

पैठण, सिल्लोडला बंद, गंगापुरात निषेध मोर्चा:दिल्लीत विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित आघाडीचे आंदोलन‎




दिल्ली आंदोलनातील विद्यार्थी लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी महाराष्ट्र बंद पाळला होता. या जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सिल्लोड, पैठण, कन्नड, सोयगाव, पाचोड, गंगापूर, लासूर स्टेशन येथे बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. काही ठिकाणी मोर्चा काढला. आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन दिले. काही ठिकाणी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गुरुवार रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला सिल्लोड शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सिल्लोड शहरातील मुख्य बाजार पेठेत दुपारपर्यंत बंद पाळण्यात आला. बाजारपेठेतील सराफा,कापड,कृषी,जनरल आदी दुकान व इतर व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून या बंदला प्रतिसाद दिला.सकाळी दहा वाजेच्या सुमारास काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी व युवक मुख्य बाजारपेठेतून फिरताना दिसून आले. दुपारनंतर अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडली होती.यानंतर शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू झाले होते. गुरुवार दिनांक २३ रोजी राज्यभरात बंदचे आवाहन करण्यात आलेले असल्याचे ग्रामीण भागातील नागरिकांना माहिती होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी सिल्लोड शहरात येणे टाळले. दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदविण्यासह शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात गंगापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व युवकांच्या वतीने गुरुवारी मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात आला. मोर्चात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणार्थी तहसीलदार सागर वाघमारे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनानुसार गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पैठण शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला,तर बिडकीन, आडूळ, चितेगाव येथे बंद पाळण्यात आला. तर पैठण शहरातील नेहरू चौक ते खंडोबा मंदिर या मार्गावर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. नायब तहसीलदार सतीश पेंडसे यांच्यामार्फत पंतप्रधान कार्यालयाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले, निवेदनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, २० जुलै रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची सीबीआयमार्फत चौकशी करावी तसेच नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक भारत आठवले, दत्ता पा. वाहुळे, शहर महासचिव राम मिसाळ, ज्ञानदेव अडसूळ, अभिजित पाटील-पवार, भानुदास चाबुकस्वार, आदर्श दळवी, अविनाश ससाणे, रवींद्र बनसोडे, प्रमोद सूर्यवंशी, अशोक मगरे, देविदास ससाणे, ओंकार शेकूकर, राजेंद्र खाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व विद्यार्थी सहभागी झाले. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद आता राज्‍यात उमटू लागले आहेत. पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी””ने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. पाचोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीसह सर्व समविचारी आंदोलकांनी पाचोड येथील सर्व व्यापाऱ्यांना आपले आस्थापने बंद करण्याचे आवाहन केले होते. व्यापाऱ्यांनी दोन तास व्यापारपेठ पूर्णपणे बंद ठेऊन आपला सहभाग नोंदवला. जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लासूर स्टेशनमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर लासूर शहरातील व्यापारी, दुकानदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, सचिव, सभापती, व्यापारी नागरिकांनी ने सहभाग नोंदवत शंभर टक्के बंद पाळला. जिल्हा उपाध्यक्ष अनिल चंडालिया, संदीप गायकवाड उपस्थित होत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *