Headlines

'पोलिसांच्या लाठीचार्जला विरोधकच जबाबदार':मंत्री उदय सामंतांचा दावा, म्हणाले- आंदोलनात विरोधकांनी घुसखोरी केली




राजधानी दिल्लीत विद्यार्थी आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला असताना, सत्ताधाऱ्यांकडून मात्र पोलिसांच्या कारवाईची पाठराखण केली जात आहे. यासंदर्भात राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी एक वेगळाच दावा करत या घटनेचे खापर थेट विरोधकांवर फोडले आहे. मंत्री उदय सामंत म्हणाले, माझा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाविषयी आदर असून, अभिजीत दिपके यांच्या माणसाने दिल्ली पोलिसांना मारहाण केली असे मी म्हणत नाही. मात्र या आंदोलनात विरोधी पक्षाच्या लोकांनी बाहेरून घुसखोरी करून हे कृत्य केल्यामुळेच पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, असे सामंत यांनी म्हटले आहे. तसेच, विरोधकांनी आंदोलनात घुसखोरी केली नसती तर लाठीचार्जची वेळच आली नसती, असा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. सिस्टम सुधारण्यास केंद्र सरकार प्रयत्नशील उदय सामंत म्हणाले, नीट पेपरफुटीवरुन सुरू असलेल्या आंदोलनातील अभिजीत दिपके आणि विद्यार्थी यांच्याबद्दल आम्हाला शंभर टक्के आदरणीय सहानुभूती आहे. पण बाहेरून येऊन काहीजण नाटक करत आहेत. तसेच कोळसा, बोफोर्स किंवा टेलिकॉममध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून राजीनामा मागितला जात नाही. तर विद्यार्थ्यांचे जीव गेले, त्याची संवेदना म्हणून हा राजीनामा मागितला जात आहे. त्यांना टार्गेट करण्यापेक्षा सिस्टम सुधारली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे. आरएसएसला शिव्या घालण्याची गरज काय? पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरणाच्या या आंदोलनात विरोधक स्वार झाले आहेत. एनडीए आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम केले जात आहे. या मंचावर आरएसएसला शिव्या घालण्याची गरज काय? नीटबाबत आता कोणीही बोलत नाही असे विद्यार्थी बोलत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्यापर्यंत हे गेले आहेत, हे मी तुमच्या माध्यमातून ऐकत आहे आणि बोलत आहे. पोलिसांच्या लाठीचार्जला विरोधकच जबाबदार आंदोलन यशस्वी होत असताना आपला यातून राजकीय फायदा होऊ शकतो त्याच भावनेतून सर्व एकत्र आले आहेत, असे म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांवर थेट आरोप केला आहे. तसेच पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जला विरोधकच जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *