![]()
कोणतीही पूर्वकल्पना किंवा ‘अलर्ट’ न देता धरणातून पाण्याचा विसर्ग करणे किती जीवघेणे ठरू शकते, याचा भयंकर प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेजमधून अचानक लाखो क्युसेक पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले. या पाण्याच्या जोरदार प्रवाहात तुमसर तालुक्यातील माडगी येथे नदीपात्रात काम करणारे तीन कामगार ट्रॅक्टरसह वाहून गेले. सुदैवाने या तिघांनीही वेळेवर किनारा गाठल्याने मोठी जीवितहानी टळली; मात्र, ट्रॅक्टर पूर्णपणे जलमय झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भंडारा जिल्हा आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गोंदियातील धापेवाडा बॅरेज प्रशासनाने पाण्याचा मोठा विसर्ग थेट वैनगंगा नदीत केला. तुमसर तालुक्यातील माडगी परिसरातील नदीपात्रात सध्या रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. पाण्याचा अचानक लोंढा आला, त्यावेळी एक ट्रॅक्टरचालक आणि दोन कामगार ट्रॅक्टरसह नदीपात्रात होते. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, बघता बघता ट्रॅक्टरसह हे तिघेही पाण्यात अडकले आणि वाहून जाऊ लागले. ‘काळ आला होता पण वेळ नाही’ या उक्तीप्रमाणे तिघांनीही प्राणांची बाजी लावून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि नदीचे पैलतीर गाठले. बॅरेज प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि निष्काळजीपणा नियमानुसार, कोणत्याही बॅरेज किंवा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना आणि स्थानिक प्रशासनाला पूर्वसूचना देणे कायदेशीररीत्या बंधनकारक असते. मात्र, धापेवाडा बॅरेजच्या अधिकाऱ्यांनी या नियमाला केराची टोपली दाखवत मनमानी पद्धतीने पाणी सोडले. दोन प्रशासनांमधील समन्वयाच्या अभावाचा हा अत्यंत गंभीर नमुना असून, या हलगर्जीपणामुळे तीन निष्पाप मजुरांचे बळी जाण्याची वेळ आली होती. यात मजुरांचे प्राण सुदैवाने वाचले असले तरी, शेतकऱ्याचा ट्रॅक्टर बुडाल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी आक्रमक; अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस या धक्कादायक घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पूर्वसूचना न देता अचानक पाणी का सोडण्यात आले? याबाबत त्यांनी थेट धापेवाडा बॅरेजच्या जबाबदार अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. आता या नोटिशीला संबंधित अधिकारी काय उत्तर देतात आणि त्यांच्या या जीवघेण्या हलगर्जीपणाबद्दल जिल्हाधिकारी कोणती कठोर कारवाई करतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. संबंधित बातम्या वाचा… भांडूपमध्ये मुसळधार पावसाचा कहर:एलबीएस मार्गावरील रस्ता आणि फूटपाथ खचला, झाडेही उन्मळून पडली मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना घडत आहेत. माटुंगा आणि दादरमध्ये झाडे पडल्याच्या घटना ताज्या असतानाच, आज (शनिवारी) दुपारी भांडूपमध्ये एक मोठी आणि धक्कादायक दुर्घटना घडली. भांडूप पश्चिमेकडील एलबीएस मार्गावर एशियन पेंट्सच्या समोर 100 बाय 100 फूट लांबीचा भलामोठा रस्ता आणि फूटपाथ अचानक खचला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका वाहनाचे नुकसान झाले आहे. सविस्तर बातमी वाचा…
6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस-वादळाचा धोका:गरज असेल तरच बाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मुंबई महानगर प्रदेशात सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा हा जोर अपेक्षेपेक्षा जास्त असून, येत्या 6 तारखेपर्यंत हे संकट कायम राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी पावसाचा कहर:वसईत पुरात अडकलेल्या नागरिकांची थरारक सुटका, मुंबई-ठाणे-पालघर जलमय, महामार्गांवर वाहतूक विस्कळीत महाराष्ट्रात मान्सूनने आता रौद्ररूप धारण केले असून, मुंबई महानगर प्रदेश (MMR), पालघर, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, वसई-विरार, सातारा आणि पश्चिम घाट परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून सखल भाग जलमय झाले आहेत. रस्ते, रेल्वे, बाजारपेठा आणि निवासी भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी मुंबईत मुसळधार पावसाचा कहर PHOTOS: अनेक ठिकाणी कंबरेएवढे पाणी, कुठे झाडे कोसळली; जनजीवन पूर्णपणे विस्कळीत मुंबईकरांची सकाळ पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झाली आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि उपनगरांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दादर, हिंदमाता, सायन, कुर्ला आणि अंधेरी सबवेसह अनेक सखल भागांमध्ये कंबरेएवढे पाणी साचल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. तर, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. सविस्तर वाचा राज्यात आडवातिडवा पाऊस:मुंबईत सलग चौथ्या दिवशी मुसळधार, कोकणात रेड अलर्ट; विदर्भातही पावसाचा जोर राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढला असून आज (४ जुलै) देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कडक इशारा देण्यात आला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धडाकेबाज बॅटिंग सुरू केल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र नागरी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबई शहरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीमधील शाळांना प्रशासनाने तातडीने सुट्टी जाहीर केली आहे. सविस्तर वाचा गुजरातमध्ये पूर, 19 जणांचे रेस्क्यू: महाराष्ट्रातही सर्वदूर पाऊस, पालघरमध्ये शाळा – कॉलेज बंद; उज्जैनमध्ये युवक वाहून गेला मान्सून देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये पोहोचला आहे. पण गुजरात – महाराष्ट्राचे काही भाग याला अपवाद आहेत. तत्पूर्वी या दोन्ही राज्यांमध्ये पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातच्या मेंडरडा परिसरात समधियाळा गावाजवळ पुराच्या पाण्यात चार गाड्या अडकल्या. त्यात अडकलेल्या 19 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तिकडे महाराष्ट्रातील नालासोपारा येथे रेल्वे स्टेशनबाहेर गुडघ्यापर्यंत पाणी साचले. प्रवाशांना पाण्यातून वाट काढत स्टेशनवर पोहोचावे लागत आहे. पालघरमध्ये पावसामुळे शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. सविस्तर वाचा
Source link
प्रशासनाचा जीवघेणा हलगर्जीपणा:पूर्वसूचनेविना धरणातून पाणी सोडले, ट्रॅक्टरसह 3 कामगार वाहून गेले; दैव बलवत्तर म्हणून बचावले