Headlines

Shashikant Shinde Denies NCP Merger Rumours; Party Unity Strong



राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देत, “काँग्रेसमध्ये जाण्याचा किंवा पक्षाचे विलीनीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. गेल्या काही दिवस

.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती, विरोधकांची भूमिका, राम मंदिरातील कथित गैरव्यवहार, मुंबईतील पावसाची परिस्थिती, कायदा-सुव्यवस्था आणि विधिमंडळाच्या कामकाजावरही सरकारवर जोरदार टीका केली.

विलीनीकरणाची चर्चा नाही, विरोधी पक्ष अस्थिर करण्याचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील काही नेते सत्तेत जाण्याच्या विचारात आहेत किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावर शशिकांत शिंदे यांनी ठाम भूमिका मांडली.

ते म्हणाले की, शरद पवार यांच्या विचारांवर पक्षाची वाटचाल सुरू असून सध्याच्या राजकीय परिस्थितीत सक्षम विरोधी पक्ष म्हणून मोठी संधी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. त्यामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात असून विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही.

सतत अशा प्रकारच्या बातम्या कोण पसरवत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा चर्चा रंगवल्या जात असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला.

१५ ऑगस्टनंतर राज्यभर संघटनात्मक दौरा

पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर देत शशिकांत शिंदे म्हणाले की, गेल्या महिनाभरापासून मुंबईसह राज्यभर बैठका सुरू आहेत. येत्या काळात राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणीत काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार असून १५ ऑगस्टनंतर सुप्रिया सुळे, पक्षाचे खासदार, आमदार आणि वरिष्ठ नेते राज्यव्यापी दौरा करणार आहेत.

या दौऱ्याद्वारे प्रत्येक जिल्ह्यात संघटना मजबूत करण्याचे आणि कार्यकर्त्यांपर्यंत थेट पोहोचण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाला पाठिंबा

राम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या आरोपांवरून उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या रामरक्षा आंदोलनालाही शशिकांत शिंदे यांनी पाठिंबा दर्शविला.

ते म्हणाले की, रामाचे नाव, मंदिराचे नाव आणि धर्माचा वापर करून सत्ता मिळवायची आणि नंतर त्याच माध्यमातून पैसा कमवायचा, असा नवीन प्रकार सुरू झाला आहे. २०१४ पासून राम मंदिराचा मुद्दा निवडणुकांमध्ये वापरला गेला, मात्र आता देणग्या आणि मंदिर व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले.

राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही चिंता व्यक्त केल्याचा उल्लेख करत, संबंधितांवर अद्याप कारवाई का झाली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच हा विषय केवळ राम मंदिरापुरता मर्यादित नसून इतर काही मंदिरांबाबतही आर्थिक अनियमिततेचे आरोप होत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या आंदोलनात स्वतःच्या पद्धतीने सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठेकेदारांना सांभाळण्यासाठीच विकासकामे

राज्यात सुरू असलेल्या विकासकामांवरही शशिकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली. पुणे, मुंबई आणि इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असली तरी त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारचे धोरण विकासापेक्षा ठेकेदारांना सांभाळण्याचे झाले आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर आमदार-खासदार फोडण्याचे राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात उद्घाटनानंतरच खड्डे पडत असल्याचा उल्लेख करत, कंत्राटदारांवर कठोर जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

मुंबईतील पावसावरून सरकारवर निशाणा

मुंबईत दोन-चार दिवसांच्या पावसानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले.

ते म्हणाले की, पावसापूर्वी नालेसफाई आणि इतर कामांबाबत पूर्वी तत्कालीन महापालिकेवर आरोप करणाऱ्यांच्या हातात आज सत्ता आहे. मात्र तरीही दादरसह अनेक भाग जलमय झाले, उघड्या मॅनहोलमुळे अपघात झाले आणि नागरिकांचे जीव धोक्यात आले.

सरकारचा प्रशासनावर वचक राहिलेला नसल्याचा आरोप करत त्यांनी अशा घटनांसाठी निष्काळजीपणालाच जबाबदार धरले.

राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप

राज्यात पुन्हा खंडणीचे फोन, टोळ्यांच्या धमक्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढल्याचा दावा करत शिंदे यांनी गृहखात्यावरही टीका केली.

व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या खंडणीच्या धमक्या, विविध शहरांतील हत्या आणि गुन्हेगारीच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला.

गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळत असल्याची भावना निर्माण झाल्यानेच गुन्हे वाढत असल्याचा दावा करत त्यांनी गृहखाते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला.

विरोधकांना बोलूच दिले जात नाही

विधिमंडळाच्या कामकाजावर टीका करत शशिकांत शिंदे म्हणाले की, अधिवेशनात मंत्रीच सभागृहात उपस्थित राहत नाहीत. शेतकऱ्यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेदरम्यानही संबंधित मंत्री अनुपस्थित असतात, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले.

विरोधी पक्षाच्या सदस्यांना पुरेसा वेळ दिला जात नसल्याचा आरोप करत त्यांनी, “जर विरोधकांना आवाजच द्यायचा नसेल, तर सभागृहात जाण्यापेक्षा रस्त्यावर उतरून आंदोलन करणे अधिक योग्य ठरेल,” अशी टीका केली.

पक्ष फोडण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत

पत्रकार परिषदेत शेवटी बोलताना शशिकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा पक्षातील फुटीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

ते म्हणाले की, देशात विरोधी पक्ष कमकुवत करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही. “आमच्या पक्षात फोडाफोडीचे प्रयत्न झाले तरी ते कधीही यशस्वी होणार नाहीत,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *