![]()
सिल्लोड कौटुंबिक वादातून व संशयाच्या भरात सासरच्या घरात घुसून जावयाने सासूवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास सिल्लोड शहरातील जयभवानीनगर येथे घडली. या हल्ल्यात पत्नी व सासऱ्यालाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयभवानीनगर येथील समरीन खालेक पटेल (२२) हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील आरेफ सत्तार पटेल (२५) याच्याशी झाला होता. आरेफ स्पेनमध्ये नोकरीस असून तो सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत असे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून समरीन माहेरी राहत होती. गुरुवारी मध्यरात्री आरेफ अचानक सासरी आला आणि समरीनला सोबत चालण्याचा तगादा लावू लागला. तिने नकार देताच त्याने आपल्या दीड वर्षाच्या मुलाला जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. समरीनने विरोध केला असता त्याने तिला बेदम मारहाण केली. हा गोंधळ पाहून समरीनची आई सादिया खालेक पटेल व वडील खालेक पटेल भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले. या वेळी संतापलेल्या आरेफने सासू सादिया यांच्यावर थेट चाकूने वार केले, तर सासरे खालेक पटेल आणि समरीन यांनाही मारहाण करून तेथून पळ काढला. जखमींवर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समरीन पटेल हिच्या फिर्यादीवरून सिल्लोड शहर पोलिसांनी आरेफ सत्तार पटेल याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, तपास फौजदार साळवे करत आहेत.
Source link
प्राणघातक हल्ला:सिल्लोड शहरात घरात घुसून जावयाचा सासूवर चाकूने हल्ला