![]()
मावस भावाला भेटण्यासाठी घाटीत आलेल्या ३५ वर्षांच्या ऊसतोड मजूर महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले. इन्स्टाग्रामवरील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन हे अपहरण करण्यात आले. १५ ते १७ जुलै दरम्यान नेवासा येथे हा प्रकार घडला. प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राजू म्हसू माळी (२७, रा. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे या आरोपीचे नाव आहे. बदनापूर तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित विवाहिता गंगापूर तालुक्यात ऊसतोडणीसाठी गेली असताना, आरोपीची तिच्या पतीसोबत ओळख झाली. १४ जुलै रोजी पीडितेचा मावसभाऊ आजारी पडल्याने त्याला घाटीत दाखल करण्यात आले होते. १५ जुलैच्या रात्री ९ वाजता पीडिता घाटीत मुक्कामी असताना आरोपीने तिला फोन करून भेटायला बोलावले. तिने जाण्यास नकार दिला असता, त्याने फोटो व्हायरलची धमकी दिली आणि दुचाकीवरून तिचे अपहरण करून तिला पत्र्याच्या शेडमध्ये डांबले आणि अत्याचार केले. मुलांची आठवण येते म्हणत केली सुटकेची विनवणी १६ जुलै रोजी त्याने तिला नेवासा भागातील एका पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तिला दिवसभर तेथेच डांबून ठेवत रात्री पुन्हा अत्याचार केले. १७ जुलै रोजी मुलांची आठवण येत असल्याची विनवणी केल्यानंतर तिला बसने गावी पाठवून दिले. इन्स्टाग्रामची ओळख ठरली तिच्यासाठी अपहरणाचे कारण पीडिता आणि आरोपी या दोघांचेही इन्स्टाग्रामवर खाते आहे. या दोघांची पहिली ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनच झाली होती. त्यानंतर प्रत्यक्ष भेट झाल्यावर याच सोशल मीडियावरील ओळखीचा आणि फोटोंचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल केले व तिचा घात केला. बदनापूर ठाण्यात शून्य एफआयआर गावी परतल्यावर पीडितेने पतीला सर्व प्रकार सांगितला आणि बदनापूर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल केला. अपहरणाची सुरुवात घाटीतून झाल्याने गुन्हा बेगमपुरा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक मनीषा केदार आणि अंमलदार संजीवनी शिंदे यांच्या पथकाने नेवासा येथे जाऊन आरोपीला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Source link
फोटो व्हायरलची धमकी देत महिलेचे घाटीतून अपहरण:पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवत अत्याचार, संभाजीनगरातील घटना; बदनापूरातील पीडिता