![]()
बालगंधर्व रंगमंदिर हे पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेले हे रंगमंदिर आता केवळ शहराचे किंवा महाराष्ट्राचे नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांनी काढले. बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या वतीने, अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत, बालगंधर्व रंगमंदिराच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘बालगंधर्व महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून उल्हास पवार बोलत होते. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, ज्येष्ठ गायक आनंद शिंदे, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. संजय चोरडिया, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, अभिनेते सुशांत शेलार, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अशोककुमार सराफ, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अलविरा मोशन एंटरटेन्मेंटच्या दिपाली कांबळे आणि ॲड. मंदार जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात ‘मेलडी मेकर्स’च्या माध्यमातून सिने संगीत क्षेत्रात योगदान देणारे अशोककुमार सराफ यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री रघुवीर खेडेकर, ज्येष्ठ पत्रकार विद्याधर कुलकर्णी, सागर आव्हाड, विजय जगताप, राज देशमुख, गायिका सावनी दातार कुलकर्णी, अलविरा झरेकर, चित्रपट निर्माते दत्ता दळवी, मंगेश मोरे, डॉ. गौरव घोडे, तसेच लोककलावंत, लेखक व दंतचिकित्सक आशुतोष जावडेकर यांनाही विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. उल्हास पवार यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या भूमिपूजन आणि उद्घाटन या दोन्ही ऐतिहासिक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याची आठवण सांगितली. शास्त्रीय संगीत, नाटक, लोककला अशा सर्व कलाप्रकारांना या रंगमंदिराच्या माध्यमातून न्याय मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. कोणत्याही कला प्रकारात श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असे काही नसते, असेही ते म्हणाले. नाट्यसंगीत हा शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, दादरा आणि ठुमरी या प्रकारांचा सुरेल संगम आहे. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांसारख्या ऋषितुल्य गायकांच्या स्वर्गीय सादरीकरणाचा बालगंधर्व रंगमंदिर साक्षीदार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्याला मिळालेला जीवनगौरव पुरस्कार हा एकट्याचा नसून सर्व सहकाऱ्यांचा सन्मान असल्याचे अशोककुमार सराफ यांनी कृतज्ञता व्यक्त करत सांगितले. ‘मेलडी मेकर्स’ने देशातील सर्व राज्यांमध्ये आणि जगातील अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये सादरीकरण केले आहे. शेकडो कलाकारांच्या प्रयत्नांमुळेच हे यश मिळाल्याचे ते म्हणाले.बालगंधर्व रंगमंदिर आणि ‘मेलडी मेकर्स’ यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमाचे पहिले बुकिंग ‘मेलडी मेकर्स’चेच होते, असे सराफ यांनी अभिमानाने नमूद केले.
Source link
बालगंधर्व रंगमंदिर सांस्कृतिक राजधानीचे वैभव: उल्हास पवार:58 व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व महोत्सवाचे आयोजन, मान्यवरांचा गौरव