![]()
वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनतर्फे आयोजित सिंहगड एपिक ट्रेल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा येत्या शनिवारी, २७ जून २०२६ रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेत जगभरातील ४ देश, भारतातील ३५ राज्ये आणि ६५ शहरांमधून १२०० धावपटूंनी सहभाग घेतला आहे. ११ किलोमीटर, २१ किलोमीटर, ३० किलोमीटर आणि ४२ किलोमीटर अंतरासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वराज्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या सिंहगडावर ही स्पर्धा गडाच्या पाच वेगवेगळ्या वाटांवरून पूर्ण करायची असते. सलग ११ तास चालणाऱ्या या माउंटन ट्रेल मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांना डोंगर-दऱ्या, चिखल, कडे-कपाऱ्या आणि सिंहगडाच्या विविध वाटांवरून धावण्याचा चित्तथरारक अनुभव मिळतो. या स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, पुरातन वास्तू आणि गडकोट संवर्धनासोबतच व्यायामाचा संदेश दिला जातो. स्पर्धेची सुरुवात आणि शेवट सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी गावातून होईल. या स्पर्धेचे आयोजन वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिग्विजय जेधे, तसेच फाउंडेशनचे सदस्य अनिल पवार, महेश मालुसरे, मंदार मते, ॲड. राजेश सातपुते, मारुती गोळे आणि अमर धुमाळ यांनी केले आहे. या आयोजनात फाउंडेशनच्या ४०० स्वयंसेवकांचाही सहभाग आहे. वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन दरवर्षी जूनच्या अखेरच्या शनिवारी सिंहगड एपिक ट्रेल या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करते. ही स्पर्धा इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशनशी संलग्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शूरवीर मावळ्यांना ही चित्तथरारक स्पर्धा समर्पित करण्यात येते, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली. यंदाच्या वर्षी स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा नियोजन समितीचे मुख्य अधिकारी किरण इंदलकर, वनविभागाचे महादेव मोहिते, पुरातत्व विभागाचे विलास वाहणे, सिंहगड रोपवेचे अध्यक्ष उदयराज शिंदे आणि घेरा सिंहगड समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. सिंहगड एपिक ट्रेलचे आयोजन शनिवार, २७ जून २०२६ रोजी पहाटे ६ वाजता आतकरवाडी, सिंहगड पायथा येथे करण्यात आले आहे.
Source link
सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॉन 27 जून रोजी:वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन